साधकांची मने जिंकून त्यांना साधनेसाठी प्रोत्साहन देणारे कर्नाटक येथील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४७ वर्षे) !

पू. शिवाजी वटकर

‘२.११.२०२३ या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात मला पू. रमानंद गौडा (पू. अण्णा, सनातनचे ७५ वे (समष्टी) संत) यांचा सत्संग लाभला. त्या वेळी त्यांच्या समवेत साधना आणि सेवा शिकण्यासाठी काही साधक आले होते. त्यांपैकी काही साधक मला म्हणाले, ‘‘आता आम्ही स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चालू केली आहे. व्यष्टी साधनेत आनंद मिळत असल्याने त्याचा आम्हाला समष्टी सेवा करतांना लाभ होत आहे.’’ याविषयी जिज्ञासा म्हणून मी पू. अण्णा आणि साधक यांना विचारल्यावर मला पू. रमानंद गौडा यांच्याविषयी पुढील सूत्रे शिकायला मिळाली.

पू. रमानंद गौडा

१. पू. रमानंद गौडा यांनी मार्गदर्शनातून जिज्ञासूंना सनातन संस्थेशी जोडणे

१ अ. पू. रमानंद गौडा यांची अहंशून्यता : मार्गदर्शनाच्या आरंभी पू. रमानंद गौडा सांगतात, ‘‘मला काही येत नाही. मी गुर्वाज्ञा म्हणून मार्गदर्शनासाठी येथे आलो आहे. माझे गुरुच माझ्याकडून आवश्यक ते बोलून घेतील.’’ यामुळे ऐकणार्‍यांना त्यांची अहंशून्यता लक्षात येते आणि त्यांची पू. अण्णांशी जवळीक होते. ऐकणारे त्यांचे मार्गदर्शन मन लावून आणि जिज्ञासेने ऐकतात.

१ आ. स्वतःची अनुभूती सांगितल्याने ऐकणार्‍यांची भावजागृती होणे : मार्गदर्शनात पू. अण्णा स्वतःच्या जीवनातील १ – २ कठीण प्रसंग सांगतात. ‘गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) त्यांचे प्रारब्ध संपवून त्यांना कसे साहाय्य केले ?’, याविषयीची अनुभूती ते भावपूर्ण सांगतात. त्या वेळी त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू वहात असतात. त्यामुळे साधक, जिज्ञासू आणि हिंदु धर्माभिमानी यांचीही भावजागृती होते.

१ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती ऐकणार्‍यांची श्रद्धा निर्माण होणे : पू. अण्णा यांनी अनुभूती सांगितल्यामुळे ऐकणार्‍यांची (साधक, जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांची) गुरूंप्रती श्रद्धा वाढते आणि ‘गुरूंनी सांगितलेली साधना करणे किती महत्त्वाचे आहे ?’, हे त्यांच्या अंतर्मनाला पटते. ‘असे महान गुरुदेव कोण आहेत आणि त्यांची शिकवण किती महान आहे !’, याची ऐकणार्‍यांना जाणीव होते. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे गुरुरूपातील ईश्वर आहेत’, असे समाजातील व्यक्तीलाही वाटते. यामुळे नवीन लोकांच्या मनात अशा गुरूंचे दर्शन घेण्याची आणि त्यांचे मार्गदर्शन ऐकण्याची ओढ निर्माण होते. ‘पू. अण्णा एवढे मोठे आहेत, तर त्यांचे गुरु किती मोठे असतील ?’, याविषयी ऐकणार्‍यांच्या मनात जिज्ञासा निर्माण होते.

१ ई. नम्रतेने आणि आत्मीयतेने मार्गदर्शन करून साधक अन् समाजातील व्यक्तींना सनातन संस्थेच्या कार्याशी जोडणे : पू. अण्णा मार्गदर्शन पुष्कळ आत्मीयतेने करतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाचा ऐकणार्‍यांच्या अंतर्मनावर संस्कार होतो आणि त्यानुसार त्यांना विचार अन् कृती करण्यास प्रोत्साहन मिळते.

पू. अण्णा सर्वांशी अतिशय नम्रतेने आणि प्रेमाने बोलत असतात. त्यामुळे ते ऐकणार्‍यांची मने जिंकतात. ऐकणार्‍यांनाही त्यांनी सांगितलेले ऐकून तशी कृती करायला प्रेरणा मिळते. पू. अण्णा समाजातील धर्मप्रेमी, वैद्य, अधिवक्ते इत्यादींना मार्गदर्शन करतात आणि साधनेचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्यात साधनेविषयी गोडी निर्माण करतात. ते समाजातील व्यक्तींना सनातन संस्थेशी जोडतात. त्यानंतर अशा व्यक्ती व्यष्टी आणि समष्टी सेवा तळमळीने करू लागतात.

२. साधकांशी जवळीक साधून त्यांना ध्येयापर्यंत नेणारे पू. रमानंद गौडा !

२ अ. साधकांशी जवळीक झाल्यामुळे साधकांनी मनमोकळेपणाने स्वतःच्या साधनेची स्थिती सांगणे : पू. अण्णा मार्गदर्शन करतांना साधकांशी जवळीक साधतात. त्यामुळे साधक मनमोकळेपणाने त्यांना स्वतःच्या मनाची आणि साधनेची स्थिती अन् साधनेतील अडथळेही सांगतात. यावरून ‘साधक कुठल्या टप्प्याला आणि कोणत्या गोष्टीत अडकला आहे अन् त्याने काय करायला हवे ?’, हे पू. अण्णांच्या लक्षात येते. त्यानुसार ते साधकांना मार्गदर्शन करतात.

२ आ. साधकांचा स्थूल आणि सूक्ष्म स्तरावर अभ्यास करून मार्गदर्शन करणे : पू. अण्णा साधकांचा स्थूल आणि सूक्ष्म स्तरावर अभ्यास करतात. गुरुकृपेने पू. अण्णांना समोरच्या व्यक्तीच्या मनातील साधनेविषयीचे विचार आणि त्याची साधनेविषयीची स्थिती लक्षात येते. त्यामुळे ते साधकांना अचूक मार्गदर्शन करून पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी साहाय्य करतात. यावरून ‘संतांचे चैतन्य आणि संतांचे कार्य सूक्ष्म स्तरावर कसे चालते ?’, हे शिकायला मिळते.

२ इ. साधकांच्या मनावर व्यष्टी साधनेचे महत्त्व बिंबवणे : पू. अण्णा ‘आपल्या जीवनाचे महत्त्व आणि ध्येय काय आहे ? जीवनात साधनेचे महत्त्व काय आहे ? गुरुकृपायोगाच्या अंतर्गत साधनेमध्ये स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेतील आनंद कसा घ्यायचा ?’, हे साधकांच्या मनावर सहजतेने बिंबवतात. त्यामुळे साधक लगेच ‘दिवसांतून ४ वेळा सारणी लिखाण करणे, न्यूनतम (कमीत कमी) १० स्वयंसूचना घेणे, समष्टी सेवेत स्वतःला व्यस्त ठेवणे’ इत्यादी प्रयत्न लगेच चालू करतात.

२ ई. शिकण्यासाठी समवेत असणार्‍या साधकांना घडवणे : पू. अण्णांच्या मार्गदर्शनाच्या दौर्‍याच्या वेळी त्यांच्या समवेत काही (१० ते १५) साधक शिकण्यासाठी असतात. पू. अण्णा त्यांच्या साधनेची घडी बसवतात. प्रतिदिन ते साधकांना समष्टी सेवा देऊन त्याचा आढावा घेतात. ते ‘साधकांनी दिवसभर साधनेचे प्रयत्न किती केले ? ते कुठे कमी पडले? त्यांच्या चुका काय झाल्या ? इतरांचे निरीक्षण करून त्यांना काय शिकायला मिळाले ?’, अशा प्रकारचा त्यांच्या दिवसभराचा साधनेचा आढावा रात्री घेतात. त्यामुळे त्यांच्या समवेत शिकायला असलेले साधक घडले जातात.

२ उ. साधकांनी जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटण्यासाठी साधनेचे ध्येय घेऊन तसे प्रयत्न करण्यास आरंभ करणे : पू. अण्णा साधकांना मार्गदर्शन करतांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे (जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटण्याचे) ध्येय घेण्याविषयी विचारतात. त्या वेळी बरेच साधक हे ध्येय घेण्याचे ठरवतात. हे ध्येय घेतले, तर ‘साधकांनी कोणती साधना करायला हवी ?’ याविषयी पू. अण्णा मार्गदर्शन करतात, उदा. समष्टी सेवेसाठी वेळ देणे, गुरूंप्रती भाव असणे, स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे. परिणामी साधक स्वतः ध्येय घेऊन ते पूर्ण करण्यासाठी तळमळीने साधना चालू करतात.

पू. अण्णांच्या सत्संगामधून मला ‘समाजातील व्यक्ती, जिज्ञासू, धर्माभिमानी आणि साधक यांच्याशी सुसंवाद साधून त्यांना व्यष्टी अन् समष्टी साधनेची गोडी कशी लावावी ?’ याविषयी शिकता आले. साधकांना मार्गदर्शन करून आणि साधकांची मने जिंकून त्यांना साधनेला प्रोत्साहन देणारे पू. रमानंद गौडा आणि त्यांना घडवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.११.२०२२)