परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेली ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची डोंबिवली (ठाणे) येथील चि. हिंदवी प्रसाद वडके (वय ५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. हिंदवी प्रसाद वडके ही या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०२० मध्ये चि. हिंदवी प्रसाद वडके हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती आणि आता वर्ष २०२४ मध्येही तिची आध्यात्मिक पातळी ५९ टक्के आहे.’ – संकलक)

चि. हिंदवी प्रसाद वडके

१. शांत स्वभाव : ‘हिंदवी शाळेत असतांना तिला कुणी मारले किंवा काही बोलले, तर ती वर्गातील शिक्षिकेला जाऊन सांगते किंवा घरी येऊन ‘अशा वेळी मी काय करू ?’, असे विचारते. ती स्वतःहून कुणाला मारत नाही. शाळेतील शिक्षिका आणि अन्य मुलांचे पालक ‘हिंदवी शांत आणि गुणी मुलगी आहे’, असे सांगतात.

२. सभाधीटपणा : तिच्या शाळेत लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत तिने क्षात्रभावाने विषय मांडला. त्यात तिचा द्वितीय क्रमांक आला. तिला मिळालेले पारितोषिक तिने ‘देवाच्या पुढे ठेवूया’ असे स्वतःहून सांगितले.

३. सहनशील : एकदा एका अपघातात ती दुचाकीवरून पडली. तेव्हा तिच्या ओठातून रक्त आले. नंतर एकदा गाडीची धडक लागून ती मार्गात खाली पडली होती. तेव्हा दोन्ही प्रसंगात ती न रडता स्वतःहून धीटपणे उभी राहिली.

४. धर्माचरणाची आवड

अ. ती कुंकू लावूनच बाहेर जाते.

आ. तिला परकर-पोलका घालायला आवडतो. दूरदर्शनवरील एका मालिकेत एका मुलीने तोकडे कपडे घातले होते. तेव्हा हिंदवी म्हणाली, ‘‘आई, असे कपडे घालणे घाण आहे ना ?’’

५. सतर्कता : एकदा माझ्या यजमानांचे नातेवाईक रुग्णालयात होते. हिंदवीने तिच्या वडिलांना नातेवाइकांशी बोलतांना ‘मी औषध आणतो’, असे सांगितलेले ऐकले होते; मात्र यजमान औषध आणायला विसरले. तेव्हा तो प्रसंग लक्षात ठेवून हिंदवीने तिच्या वडिलांना औषध आणण्याची आठवण केली.

६. प्रेमभाव

अ. हिंदवीला कुणी चॉकलेट दिल्यास आधी ती आम्हाला (आई-बाबांना) देते आणि नंतर स्वतः खाते.

आ. तिला झाडे आणि प्राणी यांच्याविषयी जिव्हाळा आहे.

७. सेवेची आवड : मी ठाणे सेवाकेंद्रात सेवेसाठी गेल्यावर तेथे हिंदवी माझ्या समवेत भांडी पुसण्याची सेवा करते. तिला ‘सेवाकेंद्रात जायचे आहे’, असे समजल्यावर आनंद होतो.

८. चुकांविषयी संवेदनशील : तिच्याकडून एखादी चूक झाल्यास ती कान पकडून क्षमा मागते आणि ‘चूक झाली’, हे प्रामाणिकपणे स्वीकारते. एकदा तिच्याकडून एक खेळणे तुटल्यावर ती रडत तिच्या वडिलांकडे आली. हिंदवी तिच्या वडिलांना म्हणाली, ‘‘मला क्षमा करा. माझी चूक झाली.’’ या प्रसंगात ‘तिला चुकीची खंत वाटत होती’, असे मला जाणवले.

९. आई-वडिलांना योग्य दृष्टीकोन देणे

अ. मी जोरात दार लावल्यास किंवा एखादी वस्तू अयोग्य पद्धतीने ठेवल्यास ती मला त्याविषयी जाणीव करून देते आणि ‘योग्य कृती कशी करायची ?’, याविषयी समजावून सांगते.

आ. आम्ही अशुद्ध भाषा बोलल्यास ती आम्हाला शुद्ध भाषेत बोलण्याची आठवण करून देते. मी कार्यालयीन कामाविषयी इतरांशी बोलतांना कधी ‘हॅलो’ किंवा ‘थँक्यू’ म्हणाल्यास ती मला सांगते, ‘‘आई, ‘हॅलो’ नाही, नमस्कार म्हणायचे. ‘थँक्यू’ नाही, धन्यवाद म्हणायचे.’’

१०. साधनेप्रती ओढ

अ. मागील २ वर्षांपासून ती रात्री झोपतांना माझ्याकडून ‘बालसंस्कार ॲप’मधील २ गोष्टी वाचून घेते. ती मला काही गोष्टी जशाच्या तशा सांगते.

आ. आम्ही दुचाकीवरून जात असतांना ती नामजप आणि जयघोष करते किंवा भजन म्हणते.

इ. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील बालसाधकांच्या संदर्भात किंवा तिला कळणारे अन्य लेख ती ‘वाचून दाखव’, असे मला सांगते. ती काही शब्द स्वतः वाचण्याचा प्रयत्न करते.

ई. तिला बालसत्संग ऐकायचा असतो.

उ. ती प्रतिदिन जेवणापूर्वी प्रार्थना करते.

ऊ. ती आधुनिक वैद्य होण्याचा खेळ खेळते. ती इंजेक्शन देतांना नामजप करते. ‘जप करत इंजेक्शन दिले, तर तुम्हाला त्रास होणार नाही’, असा तिचा भाव असतो.

ए. हिंदवी घरी असतांना घरात चैतन्य जाणवते. ‘ती आहे; म्हणून आम्ही साधनेत आहोत’, असा तिच्या बाबांचा भाव असतो.

११. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव : हिंदवीचा परम पूज्यांच्या प्रती पुष्कळ भाव आहे. ती सतत ‘मला परम पूज्यांच्या आश्रमात जायचे आहे. मी त्यांच्या समवेत राहीन’, असे सांगत असते.

१२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी अनुभवलेला भाव

सौ. स्नेहल वडके

अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी ‘परम पूज्यांचे दर्शन होणार’, या विचाराने तिला पुष्कळ आनंद झाला होता. ती ११.५.२०२३ हा दिनांक दिनदर्शिकेत पहात होती.

आ. ब्रह्मोत्सवाच्या आदल्या दिवशी आम्ही प.पू. भक्तराज महाराज यांची भजने म्हणत होतो. तेव्हा आम्हाला परम पूज्यांची पुष्कळ आठवण येत होती आणि भावजागृती होत होती.

इ. ब्रह्मोत्सवाच्या दिवशी हिंदवी मैदानात बसून परम पूज्यांची आतुरतेने वाट पहात होती. तिला गुरुमाऊली दिसल्यावर ती सतत त्यांच्याविषयी प्रश्न विचारत होती. ‘परम पूज्यांनी आणखी एकदा आपल्या जवळून जायला हवे. मला त्यांच्या रथात बसायचे आहे, त्यांच्या मांडीवर बसायचे आहे’, असे ती सतत सांगत होती. तिच्या डोळ्यांतून सतत भावाश्रू वहात होते. मी तिची अशी भावावस्था प्रथमच पहात होते.

ई. परम पूज्य मैदानातून परत जात असतांना ‘ते जाऊ नयेत’, यासाठी हिंदवी रडत होती. तिला ‘आपण पुढच्या वर्षी पुन्हा आश्रमात येऊ’, असे सांगितल्यावर ती शांत झाली.

१३. स्वप्नात परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीकृष्ण आणि शंकर महाराज यांचे दर्शन होणे : एकदा हिंदवीचे वडील वैयक्तिक कारणांमुळे पुष्कळ अस्वस्थ होते. दुसर्‍या दिवशी हिंदवी तिच्या वडिलांना म्हणाली, ‘‘बाबा, माझ्या स्वप्नात परम पूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले), श्रीकृष्ण आणि शंकर महाराज (यजमानांचे आधीचे धनकवडी, पुणे येथील गुरु) आले होते. शंकर महाराजांनी तुम्हाला मांडीवर घेतले होते. श्रीकृष्णाचा आशीर्वादाचा हात आकाशात होता आणि परम पूज्य तुमच्या डोक्यावरून हात फिरवत होते.’’ हे ऐकून आमची भावजागृती झाली.

१४. हिंदवीला झालेला वाईट शक्तींचा त्रास आणि नामजपादी उपाय केल्यावर तिला होत असलेला त्रास दूर होणे : सहा मासांपूर्वी हिंदवीला ‘रात्री दचकून उठणे, घाबरणे, वाईट शक्ती दिसणे’ असे त्रास होत होते. ती सांगत असे, ‘‘रात्री मला कुणीतरी दिसते.’’ सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी रात्रीच्या वेळी दत्ताचा नामजप लावायला सांगितला. त्यानुसार आम्ही भ्रमणभाषवर नामजप लावल्यावर आणि हिंदवीची दृष्ट काढल्यावर तिला होत असलेला त्रास दूर झाला. नंतर आम्हाला कळले की, ‘आम्ही ज्या घरात रहात होतो, त्या घरात एका व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला होता आणि तिची शक्ती तिथे होती.’ यजमानांनाही ती शक्ती दिसली होती. आम्ही घर पालटल्यावर हिंदवीला पुन्हा त्रास झाला नाही.

१५. हिंदवीचे स्वभावदोष : स्वार्थी आणि आळशी.’

– सौ. स्नेहल प्रसाद वडके (चि. हिंदवीची आई), डोंबिवली, जि. ठाणे. (१७.८.२०२३)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक