Maldives China Support : मालदीवमध्ये भारतीय पर्यटक घटले, तर चिनी पर्यटक वाढले !

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुईज्जू

माले (मालदीव) – भारत आणि मालदीव यांच्यातील वादाच्या पार्श्‍वभूमीवर भारतातून मालदीवमध्ये जाणार्‍या पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली असतांना दुसरीकडे चीनच्या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

१. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाने घोषित केलेल्या पर्यटकांच्या आकडेवारीनुसार ४ फेब्रुवारीपर्यंत मालदीवमध्ये सर्वाधिक २३ सहस्र ९७२ पर्यटक चीनमधून आले होते. यावर्षी केवळ १६ सहस्र ५३६ भारतियांनी मालदीवला भेट दिली आहे. येथे फेब्रुवारीपर्यंत एकूण पर्यटकांमध्ये भारताचा वाटा ७.७ टक्के आहे, तर चीनचा वाटा ११.२ टक्के इतका आहे.

२. गेल्या मासामध्ये मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुईज्जू यांनी चीनचा दौरा केला होता. तेथे त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना त्यांच्या देशाच्या नागरिकांना मालदीवमध्ये पर्यटनासाठी येण्याचे आवाहन करण्याची विनंती केली होती. यामुळेही चीनच्या पर्यटकांची वाढ झाल्याचे म्हटले जात आहे.

१० मेपर्यंत भारतीय सैनिक माघारी जातील ! – राष्ट्रपती मुईज्जू यांचा दावा

५ फेब्रुवारी या दिवशी मालदीवचे राष्ट्रपती त्यांच्या संसदेतील पहिल्याच भाषणात  म्हणाले की, भारतासमवेतच्या चर्चेत असे ठरले आहे की, भारताचे सर्व ८० भारतीय सैनिक १० मेपर्यंत भारतात परततील. मालदीवमध्ये ३ एव्हिएशन प्लॅटफॉर्म (विमानांच्या संदर्भातील उपकरणे आणि साहित्य यांसंदर्भातील व्यवस्था) आहेत. यांपैकी एकावर कार्यरत असलेले सैनिक १० मार्चपर्यंत भारतात परततील. यानंतर आणखी २ प्लॅटफॉर्मवर कार्यरत असलेले भारतीय सैनिक १० मेपर्यंत त्यांच्या देशात जातील.

मुईज्जू पुढे म्हणाले की, मालदीव भारतासमवेत जल संशोधन कराराचे नूतनीकरणही करणार नाही. आम्ही कोणत्याही देशाला आमच्या सार्वभौमत्वात हस्तक्षेप करू देणार नाही.

संपादकीय भूमिका

मालदीव आत्मघाताच्या दिशेने जात असतांना त्याचा मोठा धोका भारतालाही आहे. त्यामुळे भारताने वेळीच या स्थितीवर योग्य कृती करून मालदीवला चीनच्या नियंत्रणात जाण्यापासून रोखले पाहिजे.