साधकांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जाऊन श्रीकृष्णाचे मार्गदर्शन घेणे

भावप्रयोग

सौ. निवेदिता जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जाऊन श्रीकृष्णाचे मार्गदर्शन घेणे, हा भावप्रयोग साधकांकडून करवून घेतला. त्या वेळी ‘प्रत्यक्ष श्रीकृष्ण मार्गदर्शन करत आहे’, असा भाव त्यांनी ठेवला. तो येथे दिला आहे.

सौ. निवेदिता जोशी

‘सर्वांना भावपूर्ण नमस्कार ! भावार्चना करण्यासाठी आपण डोळे मिटूया ! सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने आपणास रामनाथी आश्रमात येण्याची संधी मिळाली आहे. आता आपण स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या प्रतिमेसमोर उभे आहोत. आपण श्रीकृष्णाशी बोलत आहोत. श्रीकृष्णाच्या दृष्टीतून अपार वात्सल्यभाव ओसंडून वहात आहे. बघता बघता श्रीकृष्णाचे ओठ हलत असल्याचे आपण अनुभवत आहोत. ‘श्रीकृष्ण काय सांगत आहे ?’, हे आपण जिवाचे कान करून ऐकूया. ते अमृतमय बोल आपल्या हृदयमंदिरात कोरून ठेवूया.

श्रीकृष्ण

आता आपल्याला श्रीकृष्ण सांगत आहे, ‘तुम्ही भक्ती वाढवा, साधना वाढवा. मी तुमच्याजवळच आहे. मीच गुरुरूपात तुमचा सांभाळ करत आहे. तुम्ही प्रतिदिन मला ‘कृष्णं वन्दे जगद्गुरुं ।’, असे म्हणून आळवत असता. मी द्वापरयुगातील गोपींना भक्ती दिली. आता कलियुगातील या संधिकालात तुम्हाला मी गुरुरूपात येऊन साधना सांगून, तसेच स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याची प्रक्रिया सांगून तुम्हाला अहंविरहित करत आहे. तेवढे प्रयत्न तुम्ही तळमळीने आणि मला शरण येऊन करा. आपल्याला लवकरच हिंदु राष्ट्राची पहाट पहायला मिळणार आहे. माझी गोचर दृष्टी तुम्हा सर्व साधकांचे आपत्काळात संरक्षककवच बनून रक्षण करणार आहे.’

प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या मुखातून ही वाणी आली. प्रत्यक्ष आपल्याला ती श्रवण करण्याची संधी गुरुकृपेने मिळाली; म्हणून आपला कृतज्ञताभाव दाटून आला आहे. आपण श्रीकृष्णाच्या चरणी संपूर्णपणे शरणागत झालो आहोत. श्रीकृष्णाच्या सुदर्शनचक्राची गती अधिक वाढल्याचे आपल्याला दिसत आहे. आपल्या सभोवताली असणारे त्रासदायक शक्तीचे सर्व आवरण गळून पडले आहे. त्यासह श्रीकृष्णाने त्याच्या सुदर्शनचक्राने आपल्या गतजन्मातील पापांचा नाश केला आहे. त्यामुळे आता आपण हलके होऊन श्रीकृष्ण रूपातील गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करत आहोत. कृतज्ञता !’

– सौ. निवेदिता जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), ठाणे

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक