हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांच्याकडून समितीचे रत्नागिरी येथील कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांना शिकायला मिळालेली अन् जाणवलेली सूत्रे !

‘हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी राष्ट्र आणि धर्म यांविषयी दिलेल्या योगदानाबद्दल उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अन् लोकसभेच्या माजी सभापती श्रीमती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते २५.६.२०२३ या दिवशी नोएडा (उत्तरप्रदेश) येथे त्यांना ‘सांस्कृतिक योद्धा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या संदर्भात त्यांचा सार्वजनिक सत्कार, व्याख्याने आणि पत्रकार परिषद यांचे आयोजन रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात आले होते. या वेळी समितीचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांना श्री. रमेश शिंदे यांच्याकडून शिकायला मिळालेली अन् त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

(भाग ३)

या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा  : https://sanatanprabhat.org/marathi/754648.html

श्री. रमेश शिंदे

२. हिंदुत्वनिष्ठांना शिकायला मिळालेली आणि जाणवलेली सूत्रे

२ अ. श्री. राकेश नलावडे, तालुकाध्यक्ष, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी.

१. ‘एवढ्या अल्प वयात संपूर्ण भारतभर भ्रमण करून आणि जीव धोक्यात घालून श्री. रमेशदादा राष्ट्र अन् धर्म यांविषयीचे कार्य करत आहेत. यातून आम्हाला पुष्कळ शिकायला मिळाले. ‘राष्ट्र आणि धर्म यांसंदर्भात आम्ही करत असलेले कार्य नगण्य आहे’, याची जाणीव आम्हाला झाली.

२. काही कारणांमुळे आम्हाला आलेली मरगळ दादांच्या व्याख्यानामुळे निघून गेली.

३. दादा जेव्हा काही मासांनी येथे परत येतील, तेव्हा आम्ही युवकांसाठी एका मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन करणार आहोत.’

२ आ. श्री. दीपक अर्जुनसिंग देवल, श्री मरुधर विष्णु समाज सेवा समिती, रत्नागिरी

२ आ १. शिकायला मिळालेली सूत्रे

अ. ‘रत्नागिरी शहरात श्री. रमेश शिंदे यांचा सत्कार समारंभ आणि व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. देवाच्या कृपेने रमेशदादांच्या निवासाची व्यवस्था आमच्याकडे होती. ते आमच्याकडे दोन दिवस राहिले. या काळात माझी त्यांच्याशी राष्ट्र आणि धर्म या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्या वेळी आम्हाला दादांचे अनुभव ऐकण्याचा लाभ झाला. गेल्या १५ वर्षांपासून त्यांच्या देश आणि धर्म यांविषयीच्या अखंड सेवेतील अनुभव जाणून घेतल्यानंतर माझ्या मनातील त्यांच्याविषयीचा आदर वाढला. त्यांच्याशी बोलल्यावर मला ‘सध्याच्या परिस्थितीत तर्कशुद्धपणे कसे वागले पाहिजे ? एखाद्या विषयाचे न्यायसंमत समर्थन किंवा विरोध कसा करावा ? सर्वसामान्य हिंदूंमध्ये जागृती कशी करावी ? हिंदूंचे संघटन कसे करावे ?’, इत्यादी अनेक विषयांवर माहिती मिळाली.

आ. रमेशदादा भारतातील बहुतेक राज्यांत धर्मप्रसारासाठी गेले आहेत. विशेषत: पूर्व, पूर्वोत्तर आणि उत्तर भारतातील क्षेत्रे येथील लोकांची मानसिकता, तेथील संस्कृती, तसेच खाद्य संस्कृती यांविषयी त्यांचा विशेष अभ्यास असल्याचे पाहून मला त्यांचा अभिमान वाटला.

इ. ‘हलाल जिहाद’विषयी दादांनी केलेले संशोधन, लेखन आणि त्या विरोधात सनदशीर मार्गाने उभारलेला संघर्ष’ यांविषयी दादांकडून माहिती मिळून मला प्रेरणा मिळाली.

ई. त्यांनी रत्नागिरीतील व्याख्यानात उपस्थित हिंदूंना जागृत करणार्‍या गोष्टी सांगितल्या. विषय अतिशय सोप्या आणि स्पष्ट शब्दांत लोकांपर्यंत पोचवण्याचे त्यांचे कौशल्य मला अभ्यासता आले.

उ. रमेशदादांना साहित्य (ग्रंथ इत्यादी) आणि लेखन यांच्या जगतात पुष्कळ रुची असून त्यांचा त्यात सहभागही आहे.

२ आ २. जाणवलेली सूत्रे

अ. व्याख्यानात विषय मांडत असतांना त्यांचा चेहरा अतिशय तेजस्वी दिसत होता.

आ. आम्ही सर्व कुटुंबीय शिंदे यांच्या व्यक्तीमत्त्वाने पुष्कळ प्रभावित झालो.

इ. ‘त्यांच्यावर भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवलेजी यांची मोठी कृपा अन् आशीर्वाद आहे’, असे मला जाणवले.

ई. ‘आम्हा देवल कुटुंबियांना श्री. रमेश शिंदे यांचा सहवास मिळाला आणि एक प्रकारे संतसेवा करण्याचे भाग्य मिळाले’, याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. जय श्रीराम !’

२ इ. बर्‍याच हिंदुत्वनिष्ठांनी ‘दादांच्या मार्गदर्शनातून आम्हाला पुष्कळ शिकायला मिळाले’, असे सांगितले.

३. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘श्री. रमेशदादा एक प्रकारे हिंदु जनजागृती समितीचा ‘थिंक टँक’ (वैचारिक गट) आहेत. प.पू. गुरुदेवांच्या ज्ञानशक्तीतील धर्मरक्षणाच्या भागाचा अंश रमेशदादांमध्ये पहायला मिळतो. त्यामुळे ‘हिंदूसंघटन, धर्मजागृती आणि धर्मरक्षण यांविषयी कोणतीही शंका किंवा प्रश्न असल्यास त्याचे निराकरण दादांकडून होणार’, याची निश्चिती केवळ कार्यकर्त्यांनाच नाही, तर समाजातील अनेकांना आहे.

‘शेकडो कि.मी.चा प्रवास करणे, वेगवेगळ्या ठिकाणी निवास, वेगवेगळ्या ठिकाणचे भोजन, वेगवेगळ्या ठिकाणची सामाजिक मानसिकता, वेगवेगळ्या प्रकृतीच्या व्यक्ती यांच्याशी जुळवून घेणे, एकंदर सर्व परिस्थितीचा अभ्यास करून सनातन धर्माचे आणि त्याच्या रक्षणाचे महत्त्व सांगून समाजाला कृतीप्रवण करणे’, हे शिवधनुष्य सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या प्रेरणेने कार्य करत असलेले समितीचे कार्यकर्ते ते लीलया पेलत आहेत. ते भारतातील विविध राज्यांत जाऊन सनातन धर्माच्या प्रसाराचे आणि रक्षणाचे कार्य करत आहेत’, याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव अन् समितीचे कार्यकर्ते यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दही अपुरे आहेत. आज केवळ एका राज्यातील, एका जिल्ह्यातील, एका तालुक्यातील, एका गावात प्रसार करतांना ‘मी पुष्कळ सेवा करतो’, हा माझा अहंभाव रमेशदादांच्या रत्नागिरी दौर्‍यामुळे नष्ट व्हायला साहाय्य झाले.

रमेशदादांमधील ‘राष्ट्र अन् धर्म प्रसार करण्याची तळमळ आणि त्यासाठी कोणतेही कष्ट घेण्याची सिद्धता, परिपूर्ण सेवा करणे, एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करणे, नवनवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती, कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणे, प्रेमभाव, सतर्कता, संभाषणकौशल्य, इतरांचा विचार करणे, इतरांची काळजी घेणे, अंतर्मुखता, स्थितप्रज्ञता, प्रसंगावधान’ इत्यादी गुण आम्हा सर्वांमध्ये निर्माण होण्याच्या दृष्टीने आमच्याकडून तळमळीने प्रयत्न होऊ देत’, अशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. संजय जोशी, रत्नागिरी (२८.८.२०२३)

(समाप्त)