सभापती रमेश तवडकर यांचा कला आणि संस्कृती मंत्र्यांवर आरोप, तर निधी अपव्यय प्रकरणी अन्वेषण चालू असल्याचा मंत्री गोविंद गावडे यांचा खुलासा
पणजी, २ फेब्रुवारी (वार्ता.) : खोतीगाव, काणकोण येथे अनेक संस्थांनी सांस्कृतिक कार्यक्रम न करताच कला आणि संस्कृती खात्याकडून निधी उकळल्याचा आरोप खोतीगाव पंचायतीचे सरपंच आणि पंचसदस्य यांनी केला आहे. या प्रकरणी विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी निधी अपव्यय प्रकरणाला कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे हे उत्तरदायी असल्याचा आरोप करून या प्रकरणाचे अन्वेषण करण्याची मागणी केली. आरोपाला उत्तर देतांना मंत्री गोविंद गावडे यांनी या प्रकरणाची खात्यांतर्गत अन्वेषण चालू असल्याची आणि लवकरच तथ्य समोर येणार असल्याची माहिती दिली.
(सौजन्य : prime media goa)
खोतीगाव पंचायतीचे सरपंच आणि पंचसदस्य यांनी पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोप केला आहे की, काणकोण तालुक्यातील काही पंचायतींमधील अनेक संघटनांनी सांस्कृतिक कार्यक्रम न करता सांस्कृतिक कार्यक्रम करण्याच्या नावाखाली कला आणि संस्कृति खात्याकडून सर्वांनी मिळून एकूण २६ लाख ८५ सहस्र रुपये निधी उकळला आहे.
सभापती रमेश तवडकर म्हणाले, ‘‘या घोटाळ्याची संबंधित मंत्र्यांना माहिती होती आणि त्यामुळे या प्रकरणी संबंधित खात्याचे मंत्री, तसेच कला आणि संस्कृती खाते यांचे अन्वेषण करावे.’’
कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले, ‘‘कला आणि संस्कती खाते उगाचच कुणालाही पैसे देत नाही, तर कार्यक्रम घडवून आणल्याचा पुरावा घेऊनच पैसे दिले जातात. कार्यक्रम न करताच पैसे घेतल्याचे आढळल्यास ही रक्कम संबंधितांकडून वसूल करून केली जाणार आहे. मी कोणत्याही प्रकारच्या अन्वेेषणाला सिद्ध आहे.’’ ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी या प्रकरणी मंत्री गोविंद गावडे यांच्याकडे पदाचे त्यागपत्र देण्याची मागणी केली आहे.
प्रकरणाचे अन्वेषण करणार ! – मुख्यमंत्री
कला आणि संस्कृती खात्याने दिलेले अर्थसाहाय्य योग्यरित्या वापरले कि नाही, याविषयी चौकशी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.