काश्मीरवर भारताचे बेकायदेशीर नियंत्रण ! – पाकचे परराष्ट्रमंत्री जलील अब्बास जिलानी (Pakistan On J & K)

  • पाकचे परराष्ट्रमंत्री जलील अब्बास जिलानी यांचे इतिहासजमा झालेले वक्तव्य !

  • काश्मिरी भारताच्या अत्याचारांना धैर्याने सामोरे जात आहेत !

पाकचे परराष्ट्रमंत्री जलील अब्बास जिलानी

ब्रसेल्स (बेल्जियम) – जेव्हा जम्मू-काश्मीरचा प्रश्‍न संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार आणि काश्मिरींच्या इच्छेनुसार सोडवला जाईल, तेव्हाच दक्षिण आशियामध्ये शांतता प्रस्थापित होईल. भारताने जम्मू-काश्मीरवर बेकायदेशीरपणे नियंत्रण मिळवले आहे, असे वक्तव्य पाकचे परराष्ट्रमंत्री जलील अब्बास जिलानी यांनी केले. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथील पाकिस्तानी दूतावासात कथित ‘काश्मीर एकता दिवस’ साजरा करण्यात आला. त्या वेळी जिलानी बोलत होते.

या कार्यक्रमात जम्मू-काश्मीरमध्ये भारताकडून कथित अत्याचार झाल्याने काश्मिरींची दुर्दशा झाल्याचे एका प्रदर्शन लावण्यात आले होते.

१. या वेळी जिलानी म्हणाले की, भारत बळजोरीने जम्मू-काश्मीरवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. काश्मिरींची इच्छा दाबण्यात भारत अपयशी ठरला आहे.

२. ते पुढे म्हणाले की, आज आम्ही त्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, ज्यांनी काश्मीरसाठी भारतीय अत्याचारांना तोंड देत प्राण गमावले. त्यांचे बलीदान इतिहासाच्या स्मरणात राहील. (अत्याचार करणार्‍यांचीही इतिहासही शिकवला जातो. त्यात अशा जिहाद्यांचे नाव निश्‍चित समाविष्ट केले जाईल ! – संपादक)

३. जम्मू-काश्मीरमध्ये भारताकडून होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढे येऊन निषेध करण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले. या माध्यमातून भारत सरकारचा ५ ऑगस्ट २०१९ चा कलम ३७० रहित करण्याचा निर्णय मागे घेता येईल आणि काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करता येईल. (दिवास्वप्नात रमणारा पाकिस्तान ! अर्थात् याचा भारताला लाभ होऊन पाकला कळायच्या आतच भारत पाकव्याप्त काश्मीरवर भारतीय राष्ट्रध्वज फडकावेल ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • पाकच्या अशा वक्तव्यांना चीन, तुर्कीये किंवा काही इस्लामी देश पाठिंबा देतील. युद्धात होरपळून निघालेला युक्रेनही आता भारताच्या बाजूनेच आहे. त्यामुळे भुकेकंगाल पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बुद्धीच्या दिवाळखोरीची कीव करावी तेवढी थोडीच !
  • जिहादी आतंकवादाचा जनक असलेल्या पाकला काश्मिरातील आतंकवाद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी चालू असलेले भारताचे प्रयत्न अत्याचारच वाटणार !