खोटे अधिकारी होऊन व्यापार्‍याची लाखो रुपयांची फसवणूक करण्याचा पोलिसांचा प्रयत्न !

निजामपूर (धुळे) येथील प्रकार !

धुळे – खोटा जी.एस्.टी. अधिकारी असल्याचे भासवून पटियालाच्या एका व्यापार्‍याची लाखो रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न मुंबई-आग्रा महामार्गावर करण्यात आला. त्याने या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केल्यावर हे खोटे अधिकारी म्हणजे पोलीस असल्याचे समजले. निजामपूर येथील तैनात साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बिपीन पाटील, मोहाडी पोलीस ठाण्याचा कर्मचारी इम्रान शेख आणि नाशिक येथील महिला पोलीस अधिकारी (बिपीन पाटील यांची बहीण) स्वाती पाटील यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

व्यापार्‍याचा ट्रक महामार्गावर अडवण्यात आला होता. तेव्हा लाल रंगाच्या दिव्याच्या चारचाकीतून आलेल्या खोट्या अधिकार्‍यांनी गाडीतील मालाच्या पावत्यांमध्ये नाव चुकल्याचे सांगून १२ लाख ९६ सहस्र रुपयांचा दंड मागितला. तडजोडीअंती १ लाख ३० सहस्र रुपये देण्याचे ठरले होते; पण व्यापार्‍याने तक्रार दिल्यावर पोलिसांनी वरील कारवाई केली.

साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने आतापर्यंत ७१ लाखांची लूट केल्याचे उघड !

बिपीन पाटील हा सध्या निजामपूर पोलीस ठाणे येथे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. त्याच्याकडील पोलिसांच्या शासकीय वाहनातून तो साथीदारांच्या साहाय्याने जी.एस्.टी. अधिकारी होऊन लूटमार करत होता. पोलीस अन्वेषणात आतापर्यंत त्याने ७१ लाख ३३ सहस्र ९८४ रुपयांची लूट केल्याचे उघड झाले आहे. (लाखो रुपयांची लूट होईपर्यंत धुळे पोलीस प्रशासन काय झोपा काढत होते का ? अशा पोलिसांना बडतर्फच करायला हवे आणि ही रक्कमही त्यांच्याकडून वसूल करून घ्यायला हवी ! – संपादक)

संपादकीय भूमिका :

असे लुटारू पोलीस हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद ! त्यांना आजन्म कारागृहातच डांबायला हवे !