US Predator Drone : भारताला ‘प्रीडेटर’ ड्रोन पुरवण्यास अमेरिका सरकारची मान्यता !

वॉशिंग्टन – भारताला ३१ ‘प्रीडेटर’ ड्रोन पुरवण्यास अमेरिका सरकारने मान्यता दिली आहे. ३ अब्ज डॉलर (२४ सहस्र ९०० कोटी रुपयांच्या) किमतीच्या या ड्रोन कराराची अधिसूचना येत्या २४ घंट्यांत अमेरिकी सरकारकडून जारी केली जाईल. खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येच्या कटाचा भारतावर आरोप करत अमेरिकी संसदेने हा करार थांबवल्याचे वृत्त होते. (यातून अमेरिकेचा भारतद्वेष दिसून येतो ! – संपादक) यानंतर अमेरिकेवर टीकेची झोड उठली होती. एवढेच नाही, तर भारतासोबतच्या तिच्या मैत्रीवरही प्रश्‍न उपस्थित केले गेले होते.

१. ‘प्रीडेटर’ ड्रोनचे वैशिष्ट्य म्हणजे ते मोठ्या उंचीवरून दीर्घ कालावधीसाठी उड्डाण करू शकतात. यांपैकी १५ ड्रोन भारतीय नौदलाला आणि उर्वरित प्रत्येकी ८ भारतीय भूदल अन् हवाई दल यांना देण्यात येणार आहेत.

२. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, गेल्या १० वर्षांत भारत-अमेरिका यांच्यातील संरक्षण भागीदारी लक्षणीयरित्या बळकट झाली आहे. या ड्रोन करारामुळे ही भागीदारी आणखी पुढे जाईल.

३. अमेरिकी आस्थापनाकडून एखाद्या देशाला शस्त्रास्त्रे खरेदी करायची असल्यास तेथील  कायद्यानुसार त्याला संसदेची स्वकृती मिळणे आवश्यक असते. त्यामुळे भारताने ‘जनरल टोमिक’ आस्थापनाशी केलेल्या या करारावर भारत आणि अमेरिका यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार देखरेख करत आहेत.