स्नेहसंमेलन : एक संस्कारसंधी !

प्रतिकात्मक छायाचित्र

शाळांमधून नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम पार पडले. वर्गातील बहुतेक सगळ्या लहान मुलांचा त्यात सहभाग असतो. छोट्या छोट्या मुलांना मुक्तपणे नृत्य करतांना बघणे, म्हणजे एक आनंदी वातावरण अनुभवणेच असते ! साधारण १ मास आधीपासून प्रतिदिन एक ते दीड घंटा त्या सर्व मुलांचा सराव करून घेणे, हे कौशल्याचे काम वर्गातील शिक्षक कसोशीने करतात. दोघांच्या कष्टाचे चीज होते आणि आनंदाने पार पाडतो तो शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम !

खरे तर या कार्यक्रमाकडे केवळ मनोरंजन म्हणून न पहाता ‘संस्कार करण्याची एक संधी’ म्हणून बघायला हवे, असे वाटते. या वर्षी सर्वच जण राममय झाले असल्याने बहुतेक शाळांतून श्रीरामवरील गाणीही बसवल्याचे लक्षात आले. सर्वांनाच त्यांच्या परमप्रिय प्रभु श्रीरामाच्या चरणी प्रेम व्यक्त करायची ती संधी होती. श्रीरामावरील विविध गाण्यांवर लहान मुले नाचतांना जणू ‘वानरसेनाच श्रीरामाला आळवत आहे’, असे वाटले. एका शाळेत तर संपूर्ण स्नेहसंमेलनच शिवकालीन घटनांवर आधारित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील त्यांच्या जन्मापासून ते हिंदवी स्वराज्य स्थापन होईपर्यंतचा संपूर्ण इतिहासच त्यांनी व्यासपिठावर विविध गाण्यांच्या माध्यमातून साकारला होता ! महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कसा झाला असेल, ते पहाण्याची संधी त्यामुळे सर्वांना मिळाली. या सर्वांतून मुलांवर काही ना काही चांगले संस्कार झाले.

तात्पर्य हेच की, प्रतिवर्षी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन यांनी ‘स्नेहसंमेलन हे मुलांना घडवण्याची संधी आहे’, हे लक्षात घेऊन त्याचा लाभ घ्यायला हवा. क्रांतीकारकांच्या गोष्टी, गाणी; विविध देवतांविषयीची भाव जागृत करणारी गाणी, शिकायला मिळतील अशा उद्बोधक कथा आदींचा आधार घेऊन कार्यक्रम बसवले, तर मुलांना त्यातून बोध घेता येईल. काही शाळांत चित्रपटातील गाण्यांवर नृत्ये बसवली जातात. अशा नृत्यांमुळे मुलांवर काय संस्कार होणार ?

वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यातही विद्यार्थ्यांना वेगवेगळी पारितोषिके देतांना अन्य कुठले साहित्य देण्यापेक्षा संस्कार करणारी आणि वाचनाची आवड निर्माण करणारी पुस्तके देऊ शकतो. राम-कृष्ण आदी देवता, ऋषिमुनींचे शोध, महापुरुष, राष्ट्रपुरुष, भारताचा प्राचीन इतिहास, हिंदु राजांचा इतिहास, इसापनीती, बिरबलाच्या गोष्टी, स्वातंत्र्यलढा, मालगुडी डेज, पंचतंत्र, बोधप्रद कथा, प्राचीन विज्ञान आदींची पुस्तके देऊ शकतो. स्नेहसंमेलनाकडेही विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची संधी म्हणून पाहिले, तर त्याचा त्यांना, समाजाला आणि देशाला लाभ होईल !

– सौ. प्रज्ञा जोशी, देवद, पनवेल.