धर्मक्षेत्रात केलेल्या कार्यामुळे केला गौरव !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना ‘अखिल भारतीय सारस्वत परिषद, वाराणसी’च्या वार्षिक समारंभात सन्मानित करण्यात आले. धर्मक्षेत्रातील त्यांच्या विशेष कार्यासाठी त्यांना परिषदेकडून ‘भारतरत्न पंडित मदन मोहन मालवीय स्मृती राष्ट्रीय सन्मान सोहळ्या’त सन्मानपत्र आणि इतर भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. हा कार्यक्रम बनारस हिंदु विश्वविद्यालयाच्या सभागृहामध्ये २७ जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी देशातील विविध राज्यांतील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. शिक्षण, धर्म, प्रशासन, अभिनय, वैद्यकीय, विज्ञान, योग, पत्रकारिता, समाज आणि युवा या क्षेत्रांतील विशेष कार्यासाठी ३४ मान्यवरांचा गौरव करण्यात आला. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना या कार्यक्रमात धर्मक्षेत्रातील विशेष कार्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अखिल भारतीय सारस्वत परिषदेचे राष्ट्रीय संयोजक डॉ. विवेकानंद तिवारी होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अल्मोडा (उत्तराखंड) जिल्हा न्यायाधीश श्रीकांत पांडे यांनी सभागृहाला संबोधित करतांना सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले. उत्तरप्रदेशचे आयुषमंत्री श्री. दयाशंकर मिश्रा या कार्यक्रमास उपस्थित होते, तसेच व्यासपिठावर अखिल भारतीय सारस्वत परिषदेच्या राष्ट्रीय निवड समिती सदस्य श्री. टेकनारायणजी, राष्ट्रीय अध्यक्ष श्री. श्रीकृष्ण अग्रवाल आणि सरचिटणीस प्रा. जे.एस्. त्रिपाठी उपस्थित होते. या वेळी सत्यपाल यादव आणि शिमला विद्यापिठाचे प्राध्यापक डॉ. विवेकानंद तिवारी लिखित ११ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.