१. श्री. मनोहर रमेश दहीवदकर, पाळधी, जिल्हा जळगाव
१ अ. ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या १५ दिवस आधी ‘ॐ नमो नारायणा।’ असा नामजप होणे आणि आनंद जाणवणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याला जाण्यापूर्वी १५ दिवस नामजप करतांना माझा अधून मधून ‘ॐ नमो नारायणा।’ असा नामजप होत असे. हा नामजप केल्यावर मला आनंद जाणवत असे.
१ आ. ब्रह्मोत्सवाच्या वेळी मला माझे अस्तित्व जाणवत नव्हते.
१ इ. ‘वैकुंठात सोहळा होत आहे’, असे वाटणे : ‘श्रीविष्णूच्या वैकुंठात हा सोहळा अनुभवत आहे’, असे मला वाटत होते. ते विष्णूचे प्रकाशमय रूप मला डोळ्यांत साठवता येत नव्हते. ‘सभोवती बसलेले साधकरूपी देव श्रीविष्णुस्वरूप गुरुमाऊलींना नमस्कार करत आहेत’, असे मला वाटले.
१ ई. सनातनच्या तीन गुरूंना पाहून भावजागृती होणे : परात्पर गुरु माऊलींचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) आगमन झाल्यावर मी देहभान विसरलो. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. साक्षात् विष्णुस्वरूप गुरुमाऊली, भूदेवी (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ) आणि श्रीदेवी (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) यांना पाहून माझा भाव जागृत झाला.
१ उ. ‘न भूतो न भविष्यति।’, अशा या सोहळ्याची सांगता झाल्यापासून ही अनुभूती लिहून देईपर्यंत माझ्या डोळ्यांसमोर आणि मनात सोहळ्यातील दृश्य होते. हा मला मिळालेला श्रीविष्णूचा शक्ती आणि ज्ञान यांचा प्रसाद आहे.
‘धर्मप्रचार आणि वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती शीघ्र गतीने कशी करता येईल ?’, हे उन्नत साधकांकडून शिकावे’, असे मला वाटत आहे. श्री गुरुचरणी कृतज्ञता !’
२. श्री. नीलेश पाटील (वय ४५ वर्षे), जामनेर, जळगाव
२ अ. ब्रह्मोत्सव सोहळ्यासाठी गोवा येथे जाण्यासाठी प्रवास करतांना आलेल्या अनुभूती
२ अ १. ‘जळगाव ते गोवा’ हा प्रवास लांबचा असूनही मला कोणताही त्रास जाणवला नाही. सर्व प्रवास निर्विघ्नपणे पार पडला.
२ अ २. ‘स्वभावदोष आणि अहं यांचा लय करून ब्रह्मोत्सव सोहळ्यासाठी जायला हवे’, असे वाटणे : बसने प्रवास करत असतांना साधक ‘शून्य’ हा नामजप करत होते. व्यावहारिक जीवनात ‘०’ या अंकाला अधिक महत्त्व आहे. एखाद्या अंकावर जेवढी शून्य अधिक, तेवढे त्या अंकाचे मूल्य वाढते. याउलट ‘आध्यात्मिक जीवन जगतांना आपल्याला ‘शून्य’ होता आले पाहिजे. आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांचा लय करून आपण गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) ब्रह्मोत्सव सोहळ्यासाठी ‘शून्य’ होऊनच गेले पाहिजे’, असे मला वाटले.
२ आ. ब्रह्मोत्सवाच्या दिवशी
२ आ १. ब्रह्मोत्सव स्थळी साधकांसाठी केलेली बैठक व्यवस्था पाहून ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली एका वाहनातून येऊन सर्वांना जवळून दर्शन देतील’, असे मला वाटले. काही क्षणानंतर साधकांनी त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतली.
२ आ २. सोहळ्याच्या प्रारंभी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय।’ या नामजपाने मला समष्टी चैतन्य अनुभवता आले.’
३. प्रल्हाद सोनवणे, जळगाव
३ अ. ब्रह्मोत्सवाच्या दिवशी सकाळी मानसपूजा करणे : ब्रह्मोत्सवाच्या दिवशी मी सकाळी अंघोळ करून नामजपादी उपाय केले. मी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना) भावपूर्ण प्रार्थना केली आणि मानसपूजा करायला प्रारंभ केला.
३ आ. मानसपूजा करतांना दिसलेले दृश्य : मानसपूजा करतांना माझी सहजतेने एकाग्रता साधली गेली. मानसपूजा करतांना मला दिसले, ‘गुरुदेव सिंहासनावर बसले आहेत. त्यांच्या बाजूला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आहेत.’ त्यामुळे माझे मन आनंदी होऊन माझा नामजप चांगला झाला. ‘मला मानसपूजा करतांना जसे दृश्य दिसले, त्याप्रमाणेच दर्शन होईल’, असे मला वाटले.
३ इ. मला सकाळी सूक्ष्मातून जसे दृश्य दिसले, तसेच दृश्य मला ब्रह्मोत्सव सोहळा चालू झाल्यावर दिसले. तेव्हा माझे मन भरून आले. मला ‘न भूतो न भविष्यति।’, असा आनंद झाला.
३ ई. माझ्या पेशीपेशीतून ‘कृतज्ञता ! कृतज्ञता ! कृतज्ञता !’ असा आवाज ऐकू येत होता.’
४. सौ. विमल कदवाने (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ५८ वर्षे) जळगाव
४ अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा पहाण्यासाठी गोवा येथे जायचे आहे’, असा मला निरोप मिळाला. तेव्हा मला श्री गुरुदेवांच्या प्रती अपार कृतज्ञता वाटली.
४ आ. बसमधून प्रवास करतांना
४ आ १. ‘बस म्हणजे श्रीकृष्णाचा रथ आहे’, असा भाव असणे : गोवा येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असतांना गुरुकृपेने माझ्या मनात विचार आला, ‘ही बस म्हणजे श्रीकृष्णाचा रथ आहे.’ मी बसच्या पायरीला मनोमन नमस्कार केला.
४ आ २. बसमध्ये चढल्यावर वाहनचालकाच्या ठिकाणी मला प.पू. बाबांचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) अस्तित्व जाणवले. ‘तेच वाहन चालवत आहेत’, असे मला वाटले.
४ आ ३. सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांचे दर्शन होणे : मला बसमध्ये सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांचे हसतमुख आणि वात्सल्यमय दर्शन होत होते. ‘ते सर्व साधकांशी बोलत आहेत’, असे मला वाटले. त्या वेळी त्यांनी पांढरा कद (सोवळे) आणि गुलाबी रंगाचा शेला परिधान केला होता. मला प्रवासात सतत श्री गुरूंच्या स्मरणात रहाता आल्याने प्रवास आनंदाचा झाला.
४ इ. ब्रह्मोत्सवाच्या वेळी
१. प्रत्यक्ष ब्रह्मोत्सव सोहळा चालू झाल्यावर मला आनंद झाला. सोहळा पहात असतांना मला वाटले, ‘देवलोक पृथ्वीवर अवतरला आहे.’
२. त्या वेळी माझे मन एकरूप झाले होते.
३. मला वातावरणात तेजतत्त्व जाणवत होते. मला वाटले, ‘सर्वत्र गुरुदेवांचे चैतन्य प्रक्षेपित झाले आहे.’
४. रथावर विराजमान सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ सर्व साधकांना दर्शन देत होते. ‘ते दृश्य कायमस्वरूपी माझ्या चित्तावर कोरले जावे’, असे मला वाटले.
५. ‘मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करते. इतके महान गुरु आपल्याला लाभले आहेत’, या जाणिवेने माझा कृतज्ञताभाव जागृत झाला. माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. ‘हा सोहळा गुरुकृपेनेच मला पहायला मिळत आहे’, याबद्दल माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होत होती.
६. ब्रह्मोत्सव सोहळ्याची सांगता होत असतांना प.पू. गुरुदेव रथात उभे राहून सर्व साधकांना नमस्कार करत होते. आम्ही जेथे बसलो होतो, तेथून रथ तसा दूर अंतरावरच होता. त्या वेळी एक क्षण मला दिसले, ‘मी रथाचे जवळून दर्शन घेत आहे.’ ‘काय झाले, कसे झाले’, हे मला कळलेच नाही. ‘ही सर्व श्री गुरूंची कृपा (भावलीला) आहे’, हे नंतर माझ्या लक्षात आले.
७. मला संपूर्ण ब्रह्मोत्सव सोहळ्यात भावस्थितीत आणि आनंदावस्थेत रहाता आले.
४ ई. ब्रह्मोत्सव सोहळ्याची सांगता झाल्यानंतर
१. सोहळा संपल्यानंतरही ‘गुरुदेव माझ्या जवळच आहेत’, असे मला वाटत होते.
२. गुरुदेवांचे सतत दर्शन घेत ‘त्या वातावरणातच सतत रहावे’, असे मला वाटले. इतका तो सोहळा माझ्या अंतर्मनाला भावला.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २३.५.२०२३)
|