जुन्या नोंदी असलेल्या मराठ्यांनाच आरक्षण मिळणार !
मुंबई – मराठा आरक्षणाविषयी जो निर्णय घेण्यात आला, तो केवळ पारंपरिक मराठा आरक्षणावर घेण्यात आला आहे. ज्या मराठा समाज बांधवांकडे जुन्या कुणबी नोंदी आहेत; परंतु त्यांना आरक्षण मिळण्यासाठी अडथळा निर्माण होत होता, त्यासाठी आम्ही ही आरक्षणाची प्रक्रिया सोपी करण्याचा विचार केला. यामुळे कोणत्याही आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ जानेवारी या दिवशी येथे दिली.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, अधिसूचनेत सर्व गोष्टींचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. ही अधिसूचना इतर समाजालाही मार्गदर्शक ठरणार आहे. मंत्री छगन भुजबळ आमचे सहकारी असून त्यांनी अधिसूचनेची माहिती घेतल्यानंतर त्यांचाही गैरसमज दूर होईल. आरक्षण देत असतांना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यात येणार आहे. मराठा समाजातील सगेसोयर्यांना आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी राज्य सरकारने अधिसूचना काढली आहे. त्यामुळे कुणबी नोंद असलेल्या एखाद्या नातेवाइकाच्या प्रमाणपत्रावर दुसर्या नातेवाइकाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे.