प्रबोधन लेखमालिका
‘वृंदावनातील एक गोशाळा पहाण्याचा योग आला. तेथील एका कर्मठ कार्यकर्त्याला मी विचारले, ‘‘महाराज, या गायीचे भविष्य काय ? ती गोशाळेत उपाशी राहून सुद्धा प्रसन्न आहे ? कि कसायाच्या सुर्याखाली तिची मान घालून मुक्त होऊ इच्छिते ?’’ गायींची ती अवस्था पाहून माझे मन पुष्कळ विषण्ण झाले.
१. गायीचा दुधाविषयी
खरे तर गायीची कत्तल करणे, हा घोर अपराध आहेच; पण त्याहीपेक्षा तिला उपाशी ठेवणे, हा घोर अपराध आहे. आपल्या देशातील गायींची परिस्थिती ही सुधारणे, हे आपले परमकर्तव्य आहे. तिला केवळ कडबा, गवत न देता काही पौष्टिक पदार्थ तिच्या चार्यात घालून तिला खायला दिले पाहिजे, म्हणजे ती आपल्याला पौष्टिक दुधाचा पुरवठा करील; कारण आपल्याकडे आईचे दूध नसले किंवा अल्प असले, तर बाळाला गायीचेच दूध दिले जाते. खरे तर तिच्या दुधावर पहिला अधिकार तिच्या वासराचाच असतो. त्या पाडसाला चांगले दूध मिळाले, तर ते पाडस पुढे समाजाच्या अधिक चांगले उपयोगात येईल; कारण गायीचे दूध पचायला हलके असते. ते प्राशन केल्यास आपली पुढील पिढी धष्टपुष्ट होण्यास चांगले साहाय्य होईल.
२. गोशाळेतून आर्थिक उत्पन्न चांगले मिळून परिस्थिती सुधारू शकते !
गायीच्या दुधाचे उत्पादन भरपूर प्रमाणात झाले, तर आमच्या देशाची आर्थिक व्यवस्था सुधारेल. तिचे गोमूत्र आणि शेण सुद्धा शेतीकरता खत म्हणून वापरता येईल ! आज याविषयी खेद वाटतो की, घरी किंवा गोशाळेत याप्रकारे गायींचे पालनपोषण होत नाही. वृंदावनची गोशाळा सोडली, तर इतरत्र सर्व गोशाळा चिंताजनक स्थितीत दिसतात. हरियाणात २ ते ३ गोशाळा चांगल्या दिसल्या. विशेष म्हणजे तेथे स्त्रिया गोशाळा अन् त्या स्त्रिया गायीला ‘गोमाता’ समजून देशाच्या हिताकरता तिची योग्य काळजी घेतात. त्यातून आर्थिक उत्पन्नही चांगल्या प्रकारे घेतात. त्यातून त्यांना चांगला आर्थिक लाभही होतो. अधिकाधिक लोकांनी गायीचा असा विचार केला, तर देशाची आणि हे काम करणार्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल.
३. हरियाणा आणि गुजरात ही राज्ये गोपालनात पुढे !
आज आपण गोसेवा ही गोशाळेत, शेतकरी आणि वैयक्तिक व्यक्ती यांच्याकडे पहातो. लहान मुलांकरता गोपालन करणारे तिची बरीच काळजी घेतात. तिला पौष्टिक आहार देतात. त्यामुळे तिच्याकडून मिळणारे दूधही चांगल्या प्रतीचे मिळते. माझ्या माहितीप्रमाणे हरियाणा खालोखाल गुजरातचा क्रमांक लागतो. येथील युवक-युवती या गोपालनाचे प्रशिक्षण घेऊन घरी तोच व्यवसाय करतात.
गायीला रहायला स्वच्छ जागा, प्यायला पुरेसे पाणी समवेत सरकी, ठेप, चारा, हिरवे गवत इत्यादींची सुद्धा चांगली सोय करायला हवी. गुजरातमधील लोक आपल्या नातेवाइकांनाही या कामात जोडून घेतात. ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’, या न्यायाने ते आपल्यासह नातेवाइकांचेही हित साधतात. नोकरीच्या मागे न लागता कष्ट करून चार पैसे मिळवण्याचे आत्मबल त्यांच्यात असते. हरियाणाप्रमाणे गुजरात राज्यही या कामात आघाडीवर आहे.
४. वृंदावनमध्ये गायींविषयी चालू असलेले कार्य
आपल्या धार्मिक समजुतीप्रमाणे वृंदावनात अनेक लोक त्यांची मनोकामना पूर्ण झाली, तर बाके बिहारीला गाय दान म्हणून देतात. वृंदावनात विशेष करून चांगल्या वंशाच्या गायी खरेदी केल्या जातात. त्याचे कारण त्या गायी अधिक दूध देतात; पण त्या दुधात पौष्टिकता अल्प असते. काही दानदाता गोशाळेतील गाय विकत घेऊन दान देतात; पण त्या ‘दान दिलेल्या गायीही चांगल्या सुदृढ असाव्यात’, असा विचार दानदात्याने करायला पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने गायीची स्वतःपूजा केली आहे. गायी चरायला नेणे आणि बासरी वाजवणे, हा श्रीकृष्णाचा नित्यनेम होता. गायी रानात नेतांना श्रीकृष्णाच्या पायाला काटे रुतत नव्हते, तर उलट ते त्या गायींच्या पायाची धूळ आपल्या कपाळाला लावत; कारण ‘३३ कोटी देवतांचा वास गायींच्या आचळांत (स्तनांग्रात) असतो’, अशी आपली श्रद्धा आहे. वृंदावनात असे चांगले कार्य चाललेले आहे. या गायींची उपयुक्तता आणि तिच्यापासून मिळणारे आर्थिक लाभ त्यांनी जीवनात उपयोगात आणले आहेत.
५. देश पूर्वीसारखा ‘सुजलाम् सुफलाम्’ होण्यासाठी…
आमच्या शेतकर्यांनी आज याकडे लक्ष दिले, तर उद्याचा भारत अर्थसंपन्न व्हायला वेळ लागणार नाही. आज शेतकरी ‘ट्रॅक्टरने’ शेती करू लागला आहे, तसेच शेतात खत म्हणून ‘युरिया’चा उपयोग अधिक प्रमाणात केला जातो. त्यामुळे भूमीचा कस न्यून होऊ लागतो. त्याचा परिणाम भूमी नापीक (उजाड) होते. पीक न्यून होते आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचतो. सगळी सोंग आणता येतात; पण पैशाचे सोंग आणता येत नाही. शेतकर्यांना सुखसंपन्न व्हायचे असेल आणि पूर्वीचे चांगले दिवस आणायचे असतील, तर त्यांनी पूर्वीप्रमाणे गोपालन करून दूध, दही, लोणी अन् तूप यांचे उत्पादन वाढवावे लागेल. असे झाले, तरच देश पूर्वीसारखा ‘सुजलाम् सुफलाम्’ होईल. चांगल्या वंशाचे सांड (गोवंशाची एक प्रजात) पाळावे, म्हणजे गायीपासून होणारी संतती धष्टपुष्ट होईल.
प्रत्येकाने या कार्यात काम करणार्याला साहाय्य केले आणि गायीला चांगले खाऊ-पिऊ घातले, मोकळ्या वातावरणात फिरवले, तर ती आनंदी राहील अन् आरोग्यसंपन्नही होईल. गायीला नुसता नमस्कार करून भागणार नाही, तर तिची तन, मन, धनाने सेवा करून आपले कुटुंब आणि देशाचे भविष्य सुधारूया !’
– डॉ. वनमाला क्षीरसागर, नागपूर
(साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३)