आरक्षण टिकणार नसल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे ओबीसींना आवाहन !
मुंबई – जे अधिवक्ते आहेत, त्यांनी सर्व गोष्टींचा अभ्यास करून अध्यादेशावर हरकती पाठवण्यासाठी त्वरित प्रयत्न करावेत. लाखोंच्या संख्येने सरकारकडे हरकती पाठवाव्यात. ओबीसी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनीही हरकती पाठवाव्यात, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. मुंबईतील पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
भुजबळ पुढे म्हणाले की, ‘हे आरक्षण टिकणार नाही’, असे माझे मत आहे. ‘ओबीसींचे आरक्षण शिल्लक आहे, त्यात तुम्ही आलात’, असे तुम्हाला (मराठ्यांना) वाटते. त्यामुळे ‘तुम्ही (मराठे) जिंकलात’, असे तुम्हाला वाटत आहे; पण १७ टक्के आरक्षण होते. त्यात आता ८० टक्के लोक कसे बसणार ? शासनाचा अध्यादेश खरा नसून केवळ प्रारूप आहे. ‘मराठा समाजाचा विजय झाला’, असे वाटत नाही. झुंडशाहीने कायदे पालटता येत नाहीत. उद्या लाखो लोक घेऊन कुणी आले, तर कायदे पालटणार का ? त्यांनाच विनामूल्य शिक्षण का ? ओबीसींवर अन्याय केला जात आहे कि मराठ्यांना फसवले जात आहे ?, याचा अभ्यास करावा लागेल. सरसकट गुन्हे कसे मागे घ्यायचे ?’, असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणावर हरकत घेण्यासाठी १६ फेब्रुवारीपर्यंत मुदत !सरकारने मराठ्यांना कुणबी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा अध्यादेश काढल्यानंतर त्याविषयी १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती घेतल्या जातील. १६ फेब्रुवारीनंतर अध्यादेश लागू करण्याचे विचारात घेतले जाईल, असे अध्यादेशात म्हटले आहे. |