मिरज येथे महापालिकेत डॉ. अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने धरणे आंदोलन !

महापालिकेच्या प्रवेशद्वारात आंदोलनकर्त्यांनी रस्ता अडवून ठेवल्याने नागरिकांची कुचंबणा आणि कार्यकर्त्यांसमवेत वाद !

महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करतांना डॉ. अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते

मिरज, २६ जानेवारी (वार्ता.) – मिरज बसस्थानकाजवळ असणार्‍या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यासाठी महापालिकेची वाढीव जागा मिळण्याच्या मागणीसाठी २४ जानेवारी या दिवशी ‘डॉ. अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान’च्या वतीने येथील सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या मिरज महापालिका कार्यालयातील प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वार निम्मे बंद करून त्याच्यासमोरच बसल्याने कामासाठी ये-जा करणार्‍या नागरिकांची कुचंबणा झाली. या वेळी कार्यालयात जाता न येणे आणि कार्यालयातून बाहेर पडता न आल्याने कार्यकर्त्यांसमवेत नागरिकांची वादावादी झाली.

महापालिकेत जाण्यासाठी आंदोलनकर्ते आणि नागरिक यांच्यात वादावादी झाली

या वेळी ‘जोपर्यंत महापालिकेचे शहर अभियंता पांडव हे येथे येऊन निवेदन स्वीकारून आमच्या मागण्या मान्य करत नाहीत, तोपर्यंत प्रवेशद्वारासमोर आंदोलन चालूच राहील’, असे ‘डॉ. अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान’चे अध्यक्ष भीमराव बेंगलोरे यांनी सांगितले. या आंदोलनात दादू साठे, राहुल वायदंडे, सतीश कांबळे, सागर लोंढे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. संबंधित अधिकारी सांगली येथून येणार असल्याने त्यांना वेळ लागणार होता. त्यामुळे अधिकारी येईपर्यंत बर्‍याच नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागले.

आंदोलनकर्त्यांशी वाद घालून प्रवेशद्वारातून बाहेर पडतांना नागरिक

शेवटी कार्यालयातील आतल्या बाजूस असणार्‍या काही नागरिकांनी आंदोलनकर्त्यांशी वाद घालून ते प्रवेशद्वारातून बाहेर आले. शहर अभियंता पांडव यांनी मिरज येथील महापािलकेच्या कार्यालयात येऊन निवेदन स्वीकारून मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.