संशयित शरद कळसकर याला ओळखण्यास पंचांस लागला १५ मिनिटांचा कालावधी !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील एक संशयित शरद कळसकर यांच्याशी संबंधित एका घटनेची साक्ष संभाजीनगर येथील पंच राजेश परदेशी यांची २५ जानेवारीला न्यायालयात नोंदवण्यात आली. ही साक्ष देतांना न्यायालयात उपस्थित असलेल्या संशयितांपैकी शरद कळसकर कोण ? अशी विचारणा न्यायाधिशांनी केली असता प्रारंभी पंचांना ‘कळसकर’ यांना ओळखता आले नाही. यानंतर न्यायालयाने ओळखण्यासाठी आणखी काही कालावधी दिल्यावरही ‘५ वर्षे होऊन गेल्याने ओळखणे कठीण जात आहे’, असे सांगून संशयित कोण ते खात्रीशीर सांगत येत नव्हते. शेवटी सुमारे १५ मिनिटे झाल्यावर पंच राजेश यांनी संशयित कळसकर यांना ओळखले. शरद कळसकर यांनी भ्रमणभाष, छोटी वही, दोन भ्रषणभाष, तसेच अन्य वस्तू संभाजीनगर येथील शेतात जाळल्या आहेत, असा दावा सरकारी पक्षाचा असून त्या संदर्भातील साक्ष राजेश परदेशी यांची नोंदवण्यात आली.

कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू आहे. सरकारपक्षाच्या वतीने अधिवक्ता शिवाजीराव राणे उपस्थित होते. संशयितांच्या वतीने अधिवक्ता अनिल रुईकर, अधिवक्ता डी.एम्. लटके, अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी पंचांची उलटतपासणी घेतली. या प्रसंगी अधिवक्त्या प्रीती पाटील उपस्थित होत्या. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ फेब्रुवारीला होणार आहे.

अधिवक्ता अनिल रुईकर यांनी उलटतपासणीत पंचांनी न्यायालयात साक्ष देतांना सांगितलेली अनेक माहिती प्रत्यक्ष पंचनाम्यात नमूद नाही. अन्वेषण अधिकार्‍यांचे ओळखपत्र पंचांनी पडताळले नाही, कळसकर यांच्या शेतात काही वस्तू जाळल्याचा दावा केला आहे; मात्र ते शेत कळसकर कुटुंबियांचेच आहे याची कोणतीही निश्चिती पंचांनी केली नाही, तसेच शेतात नातेवाइकांचे नाव असलेले फलकही नव्हते, घटनास्थळी जातांना ‘इनोव्हा’ गाडी वापरल्याचे सांगितले; मात्र पंचनाम्यात तसे नमूद नाही, यांसह अनेक विसंगती न्यायालयात उघड केल्या.

अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी पंचांनी साक्षीसाठी उपस्थित रहाण्यासाठी जे पत्र त्यांच्या कार्यालयास आले होते, ते प्रत्यक्ष पंचांनी पडताळले नाही, ‘घास उगवणे आणि लावणे’ यांतील फरक पंच सांगू शकत नाहीत आणि या संदर्भात पंचांची प्रत्यक्ष साक्ष अन् पंचनाम्यात वेगवेगळे नमूद केल्याचे उलटतपासणीत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.