१. निधर्मी संकल्पनेमुळे स्वैराचाराची बजबज वाढून हानी ओढावते, तर धर्माच्या अधिष्ठानामुळे मानवी जीवनाचे कल्याण होते !
प्रश्न : निधर्मी संकल्पना म्हणजे काय ? ही संकल्पना कितपत व्यवहार्य आहे ?
उत्तर : निधर्मी संकल्पना म्हणजे कोणत्याही प्रकारे, कोणत्याही परिस्थितीत कुणीही कोणताही धर्म मानायचा नाही. मानवी जीवन आणि मानवाचे समाज/राष्ट्र जीवन याचा विचार करतांना ही संकल्पना अत्यंत टाकाऊ, निरुपयोगी आणि परिणामांचा विचार करतांना केवळ घातक परिणाम करणारी अशी आहे.
उन्मादक, उच्छृंखल वृत्तींना स्वैराचारासाठी धर्म संकल्पना नाकारणे कितीही आकर्षक वाटत असले, तरी जीवन धारणेसाठी धर्म अपरिहार्य आहे. प्रत्येक मानवी समाजाने कोणता ना कोणता धर्म स्वीकारल्याचेच दिसते. जगाच्या इतिहासात एखादी धर्मव्यवस्था नाकारण्याचे प्रकार अनेक आढळतात; परंतु एखादी धर्मसंकल्पना किंवा व्यवस्था नाकारतांना अन्य एखादी धर्मव्यवस्था स्वीकारल्याचे दिसते. त्यात जे प्रामाणिक असतील, ते ‘आमचा वेगळा धर्म आहे’, असे म्हणतात. अप्रामाणिक, ढोंगी असतात, ते ‘आम्ही निधर्मी आहोत’, असे म्हणतात. धार्मिक आग्रहांना नाकारत ते निधर्मीपणाचे काही आग्रह प्रस्थापित करू इच्छितात. तोही एक धर्मच होतो.
रस्त्याने पादचारी किंवा वाहने यांनी कशा पद्धतीने जायचे ? याचे आपण काही नियम बनवले आहेत. त्याला तूर्त ‘प्रवासधर्म’ असे म्हणूया. जर सर्व नागरिक या प्रवासधर्माचे प्रामाणिकपणे पालन करतील, तर वाहतूक व्यवस्था गर्दी असूनही सुरळीत चालेल. जर प्रत्येकाने ‘मी निधर्मी आहे. हा प्रवासी धर्म मानणार नाही’, असे म्हणून आपापल्या कल्पनेप्रमाणे गर्दीमध्ये ‘दिसेल तिथे घुसेल’ अशा वृत्तीने वागायला आरंभ केला, तर काय होईल ? अनेक मोठ्या शहरांत अतिवाहतुकीच्या रस्त्यांवर अपघाताने अडथळा निर्माण झाला, तर त्या अडथळ्यापेक्षा दोन्ही बाजूंनी जमा होणार्या ‘स्वैरगर्दी’मुळेच अधिक गैरसोय होते. निधर्मी संकल्पनेमुळे स्वैराचाराची बजबज वाढून मोठी हानी होण्याचा धोका असतो, तर धर्माच्या अधिष्ठानामुळे नियमांचे पालन होऊन सर्वांना सुख मिळवण्याची सोय असते.
माणसाच्या स्वभावाचा विचार करतांना सर्वसामान्य माणसे आपले कर्तव्य चुकवण्याकडे प्रवृत्त होतात. धर्मानुशासनाच्या धाकामुळेच कर्तव्यपालनाची प्रेरणा कार्यकारी होते. जर ही प्रेरकशक्ती नाकारली, तर कुणी आपले कर्तव्य करणार नाही. परिणामी समाज-राष्ट्रजीवनाची अपरिमित हानी होईल.
२. ‘धर्माधिष्ठित न्याया’तूनच राष्ट्रीय प्रश्नांचे निराकरण शक्य !
प्रश्न : सद्यस्थितीतील आतंकवाद, भ्रष्टाचार इत्यादी राष्ट्रीय प्रश्नांचे भारतीय दृष्टीकोनातून निराकरण कसे करता येईल ?
उत्तर : आतंकवाद, भ्रष्टाचार किंवा अशा प्रकारच्या समस्या या धर्ममर्यादा मोडल्याचा परिणाम आहेत. भ्रष्टाचार अल्प करण्याच्या घोषणा सर्वजण करतांना दिसले, तरी तो न्यून होत नाही. यासाठी त्याला नष्ट करण्यासाठी ‘धर्माधिष्ठित न्याय’ स्वीकारण्यावाचून दुसरा पर्याय नाही.
जेव्हा स्वार्थ साधण्यासाठी सत्ता उपलब्ध नसते; पण सामर्थ्य असते, तिथे स्वार्थी माणूस आतंकवादाचा अवलंब करतो. त्याचे ही किंबहुना बहुतेक सर्व राष्ट्रीय समस्यांची जी मूलभूत कारणे, अनिर्बंध स्वार्थ, कर्तव्यबुद्धीचा अभाव अशी सांगता येतील, त्यांचे निराकरण उचित धर्माचरणाने होते. धर्माविना, तसेच धर्माचरणाविना पर्याय नाही. ‘नान्यः पन्था विद्यतेऽयनाय ।’ (श्वेताश्वतरोपनिषद्, अध्याय ६, वाक्य १५) म्हणजे ‘उत्तम गतीसाठी दुसरा कोणताही मार्ग नाही.’
– ब्रह्मीभूत प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘जिज्ञासा’, श्रीवरदानंद प्रतिष्ठान, श्री क्षेत्र पंढरपूर, १९९८)