‘श्रीरामजन्मभूमी यशोत्सव समिती कराड’च्या वतीने श्रीरामपूजन आणि प्रसादवाटप !

कराड, २५ जानेवारी (वार्ता.) – अयोध्या येथे होणार्‍या श्री रामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम सोहळ्याच्या निमित्ताने येथील ‘श्रीरामजन्मभूमी यशोत्सव समिती’च्या वतीने चावडी चौक या ठिकाणी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करण्यात आली, तसेच श्रीरामरक्षा आणि हनुमान चालीसाचे पठण, श्रीरामाच्या गीतांचे गायनही करण्यात आले.

या वेळी समितीचे प्रमुख तथा विश्व हिंदु परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते सर्वश्री सुनील पावसकर, प्रशांत तवर, शरद देव, दिनेश लद्दड, लक्ष्मीनारायण मणियार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मदन सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ, कारसेवक आणि श्री रामभक्त उपस्थित होते. या वेळी कारसेवक सर्वश्री सुनील पावसकर, नितीन कुलकर्णी, सुनील कदम, अजय कालेकर, सुधीर शिंदे, मकरंद गरुड, नागेश कुलकर्णी, अशोक लोहार आदी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ‘सियावर श्री रामचंद्र की जय !’, ‘जय श्रीराम !’ या जयघोषाने परिसर दणाणून गेला. कार्यक्रमाच्या शेवटी ४ सहस्र बुंदीच्या लाडवांचे प्रसादस्वरूपात सार्वजनिक वाटप करण्यात आले.

कराड शहर आणि तालुक्यामध्ये विविध मंदिरे अन् सार्वजनिक ठिकाणी हा सोहळा साजरा करत आरती करण्यात आली. चौकाचौकात श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा दिवसानिमित्त फलक, स्वागत कमानी, रस्त्याच्या दुर्तफा, तसेच घरोघरी, वाहनांवर भगवे झेंडे उभारण्यात येऊन ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सर्वत्र सार्वजनिक प्रसादाचे वाटप, तर काही ठिकाणी महाप्रसादही वाटप करण्यात आला.