भारतामध्ये पाश्चिमात्य नीती निर्माण करण्यासाठी धूर्त इंग्रजांनी रचलेले षड्यंत्र !

भारतियांनो, आजच्या स्वराज्याचे खरे स्वरूप तुम्हाला ठाऊक आहे का ?

संग्रहीत छायाचित्र

आपण स्वीकारलेले स्वराज्य पाश्चिमात्य पद्धतीचे !

जो भारत आध्यात्मिकतेच्या पायावर उभा होता, तो आता भौतिकवादावर अधिक विश्वास ठेवणारा झाला होता. हिंद देशाची भूमी, तिची विपुल साधनसंपत्ती, नैसर्गिक खजिने इत्यादींची पुष्कळ महती गाऊन हिंदु प्रजेच्या महान संस्कृतीचे सिद्धांत, हिंदु प्रजेची भव्यता, उदारता इत्यादी सर्व गोष्टी विस्मरणात जातील, असा डाव रचण्यात आला होता. अशा प्रकारे हिंदु प्रजेच्या संस्कृतीच्या महतीचा बळी देऊन हिंदूंची भूमी आणि तिच्या विपुल साधनसुविधांना अधिक महत्त्व देऊन त्यामध्ये होईल तितकी सुधारणा करून स्वतःच्या उपयोगासाठी त्याचा लाभ घेता येईल, अशा पद्धतीचे ‘स्वराज्य’ ब्रिटिशांनी आम्हाला दिले आहे. आम्ही आंतरिक प्रशासनाच्या स्वातंत्र्याच्या मोहजाळाच्या झगमगाटाने दिपून जे स्वराज्य स्वीकारले, ते पाश्चिमात्य पद्धतीचे स्वराज्यच आजचे भारताचे स्वराज्य आहे. अशा प्रकारे भारताला पाश्चिमात्य विचारसरणीवर आधारित स्वराज्याच्या दिशेने वळवण्यासाठी इंग्रजांनी तब्बल ३५० वर्षे घालवली. अशा प्रकारे आज ज्या ‘स्वराज्या’चा आपण उपभोग घेत आहोत, ते आमचे खरे स्वातंत्र्य नाही, उलट पाश्चिमात्य नीतीच्या योजनांवर ‘स्वराज्य’ या नावाची चिठ्ठी लावलेले ब्रिटिशांचे संस्थान असलेले ‘स्वराज्य’ आहे.

– पंडित प्रभुदास बेचरदास पारेख

१. भारतियांमधील स्वराज्याच्या इच्छेला वेगळेच वळण देणारे इंग्रज !

‘भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारताच्या अनेक वीर सुपुत्रांनी आत्मसमर्पण करून स्वतःचे बलीदान दिले. हा इतिहास बराच जुना आहे. वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर विदेशी शासकांना या देशातून पळवून लावण्यासाठी मातृभूमीच्या अनेक देशभक्तांनी हसत हसत आपल्या प्राणांचे बलीदान करून देशातील स्वार्थ त्यागाच्या इतिहासाला ज्वलंत ठेवले आहे; परंतु जसजशी स्वराज्याची मागणी वाढत गेली, तसतसे मुत्सद्दी इंग्रज शासक अधिकाधिक आनंदित होत गेले; कारण लोकांमध्ये उत्पन्न झालेल्या स्वराज्याच्या इच्छेला एका विवक्षित (विशिष्ट) दिशेने वळवण्यात इंग्रज यशस्वी झाले होते. क्रांतीकारकांचा जोर वाढत गेला, तसतसे इंग्रज मुत्सद्दी अधिकाधिक यशस्वी होत गेले.

२. ब्रिटिशांची स्थानिक वसाहत स्थापन करण्याचा इंग्रजांचा सुप्त हेतू !

भारतीय प्रजा ज्या मार्गावरून चालत होती, त्या मार्गावरून चालण्याचे वचन देऊन इंग्रजांनी प्रजेच्या नेत्यांचा विश्वास संपादन केला होता. इंग्रज भारतात ब्रिटीश लोकांची स्थानिक वसाहत स्थापन करण्यासाठी आले होते. त्या वेळी पुष्कळसे क्रांतीकारक परकीय राजवट हटवून स्वातंत्र्यानुसार चालणारे स्वराज्य स्थापन करण्यासाठी संघर्ष करत होते आणि आपली लुप्त होणारी भारतीय जीवनव्यवस्था पुनः प्राप्त करून स्वतंत्र होऊ इच्छित होते.

३. इंग्रजांनी स्वातंत्र्याची व्याख्याच पालटली !

हळूहळू इंग्रजांनी स्वातंत्र्याची व्याख्याच पालटण्यास आरंभ केला. पाश्चात्त्यांच्या जीवनपद्धतीलाच ‘स्वातंत्र्य’ असे म्हणून ते तिचा प्रचार करू लागले. देशी खालसा झालेली संस्थाने आणि विशेषतः त्या संस्थानांतील मंत्री यांच्याद्वारे त्यांनी स्वातंत्र्याच्या उठावाला दडपून टाकण्याचे कार्य चालू केले. ही दडपशाही करण्यासाठी खालसा झालेल्या संस्थानिकांना ब्रिटिशांनी पुष्कळ सवलत दिली आणि त्यांच्या खालसा झालेल्या संस्थानांच्या कारभारात जराही हस्तक्षेप न करण्याची दक्षता घेतली. खालसा झालेले संस्थानिक आणि त्यांची प्रजा यांच्या संघर्षात ब्रिटिशांनी संस्थानिक राजांना साहाय्य करण्याचे वचन देऊन खालसा झालेल्या संस्थानांना या चळवळी दडपून टाकण्यासाठी त्यांनी हवी तितकी मोकळीक दिली.

४. ‘स्वातंत्र्य’, ‘स्वराज्य’ हे शब्द जाणीवपूर्वक विस्मरणात नेण्यात आले !

‘स्वातंत्र्य’, ‘स्वराज्य’ यांसारखे शब्द भारतियांच्या मनात अधिक प्रमाणात गुंजन करू लागले. त्या शब्दांना पाश्चात्त्यांचे आदर्श मानलेली ध्येये जोडली गेली. भारताची मूलभूत संस्कृती टिकवण्यासाठी स्वातंत्र्य आणि स्वराज्य निर्माण करण्याचे प्रयत्न होते, हे सत्य हळूहळू गौण होत गेले अन् शेवटी त्याला बुद्धीपुरस्सर संपूर्ण विस्मरणात नेण्यात आले. त्यानंतर त्यांनी भारतीय नेत्यांच्या माध्यमातून ‘स्वराज्या’च्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या आणि त्या त्या प्रकारचे आदर्श स्वराज्याच्या संकल्पनेत समाविष्ट केले.

५. इंग्रजांकडून चाल रचली जात असल्याचा संशय !

दुसरी गोलमेज परिषद (०७ सप्टेंबर १९३१- १ डिसेंबर १९३१)

वर्ष १९१४ नंतर या कार्यक्रमाला गती मिळाली. तोपर्यंत स्वराज्याची व्याख्या पूर्णतः पालटली होती. त्या व्याख्येच्या आधारावर गोलमेज परिषदेच्या वेळी स्वराज्याची मागणी करणारा एक वेगळाच वर्ग उभा राहिला. ‘यामागे काहीतरी कूट चाल खेळली जात आहे’, असा संशय काहींना आला होता.

६. इंग्रजांनी स्वराज्याचे तंत्र केवळ हाती सोपवले !

एका वर्गाला पाश्चात्त्यांनी केलेल्या स्वराज्याच्या व्याख्येनुसार रंगवलेले स्वराज्य हवे होते. दुसर्‍या वर्गाला स्वतःच्या अधिकारांचे अबाधितरित्या संरक्षण होईल, अशा प्रकारचे स्वराज्य पाहिजे होते. दोन्ही वर्गातील लोकांना स्वराज्याची भेट देऊन इंग्रज भारतातून निघून गेले. प्रत्यक्षात पाहिले तर ते केवळ भारतातून जाऊन दूर बसले होते आणि पाश्चात्त्यांच्या स्वराज्याच्या व्याख्येतील सर्व योजनांवर ‘स्वराज्य’ अशा नावाची चिठ्ठी (लेबल) लावून त्यांचे स्वतःचे तंत्र आमच्या हातात सोपवण्यात आले.

७. पाश्चिमात्य लोकांना रहाण्याची सुविधा असलेला देश बनवण्याची इंग्रजांची धूर्त मनीषा !

आम्हाला असे वाटले की, आम्ही केलेले बलीदान आणि स्वातंत्र्यासाठी सोसलेल्या यातना यांमुळे आपल्याला स्वराज्य प्राप्त झाले आहे. नवविचारांच्या वर्गाला जे काही मिळाले, त्याचा लाभ झाल्यामुळे तो वर्गही प्रसन्न झाला. आम्ही आनंदी झालो होतो; कारण आम्हाला स्वराज्य मिळाले होते. भारताला पाश्चिमात्य, म्हणजे गोर्‍या लोकांना रहाण्याची सुविधा असलेला देश बनवण्याची त्यांची धूर्त मनीषा होती. ती १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी पूर्ण झाली.

– पंडित प्रभुदास बेचरदास पारेख (जून १९५१ च्या ‘दिव्य प्रकाश’मध्ये प्रसिद्ध झालेल्या मूळ गुजराती लेखाचा हिंदी अनुवाद)

(साभार : विनियोग परिवार ,बी/२- १०४, वैभव अपार्टमेंट, जांबली गली, बोरीवली (पश्चिम), मुंबई- ९२)


भारतियांनो, आपण स्वातंत्र्यात आहोत कि पारतंत्र्यात ?

सर्वसामान्य लोकांव्यतिरिक्त पुष्कळसे भारतीय विद्वान असेच समजतात की,

१. इंग्रज भारतात व्यापार करणे आणि राज्य करणे यांसाठीच आले होते.

२. ‘भारत छोडो’ (चले जाव) या आंदोलनामुळे इंग्रज घाबरून भारत सोडून निघून गेले.

३. भारताला स्वातंत्र्य मिळाले.

वरील समजुतींव्यतिरिक्त पुष्कळशा धारणा केवळ भ्रामक आहेत. प्रत्यक्षात असे नाही.

भारतीय प्रजेचे जीवन व्हॅटिकन चर्चच्या आज्ञेच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी इंग्रजांचा भारतात शिरकाव !

इंग्रज भारतात ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या माध्यमातून व्यापार करण्यासाठी आले नव्हते, ते भारतावर राज्य करण्यासाठीही आले नव्हते, तर ते संपूर्ण भारतीय प्रजेचे जीवन व्हॅटिकन चर्चच्या आज्ञेच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी आले होते. त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने ती योजना अमलात आणली होती. इंग्रजांना हा अधिकार पोर्तुगालपासून मिळाला होता आणि पोर्तुगालला हा अधिकार व्हॅटिकन चर्चद्वारे वर्ष १४९३ मध्ये लेखी कागदपत्राद्वारे मिळाला होता.

इंग्रजांच्या सुप्त योजनांचे फलित !

ईस्ट इंडिया कंपनी चे चिन्ह

१. वर्ष १४९८ मध्ये वास्को-द-गामाचे भारतात आगमन झाले.

२. वर्ष १६०० मध्ये ‘ईस्ट इंडिया कंपनी’ भारतात आली.

३. वर्ष १७५७ मध्ये सिराजउद्दौला याला पराभूत करून ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने राज्य स्थापन केले.

४. वर्ष १८५७ मध्ये भारतात स्वातंत्र्ययुद्ध झाले.

५. वर्ष १८५८ मध्ये ‘ईस्ट इंडिया कंपनी’ ब्रिटीश संसदेमध्ये विसर्जित झाली.

६. भारतातील धर्मामध्ये हस्तक्षेप न करण्याविषयी ब्रिटीश सरकारने आश्वासन दिले.

७. वर्ष १८५८ नंतर करण्यात आलेल्या रचनात्मक कार्यामध्ये इंग्रजी शिक्षण देणार्‍या विद्यापिठांची स्थापना केली.

८. वर्ष १८८० मध्ये निवडणुकीचा कायदा केला.

९. वर्ष १८८५ मध्ये मि. ॲलन ह्युमद्वारे ‘काँग्रेस’ची स्थापना केली.

१०. भारतीय जनमानसामध्ये काँग्रेसची चांगली प्रतिमा उभी करण्याचे नियोजन केले.

११. वर्ष १९११ मध्ये पंचम जॉर्ज याने भारतात राज्यारोहण केले.

१२. वर्ष १९१४-१५ मध्ये मोहनदास करमचंद गांधी यांना दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणले. त्यांच्याकडे काँग्रेसची सत्ता सोपवून त्यांना ‘महात्मा’ बनवले.

१३. वर्ष १९१९ मध्ये संघीय राज्यव्यवस्थेचे (फेडरल सरकारचे) बीजारोपण केले.

१४. वर्ष १९३५ चा ‘गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट’ अमलात आणला.

१५. वर्ष १९४२ मध्ये ‘भारत छोडो’ आंदोलन झाले.

१६. वर्ष १९४६ मध्ये भारताला संयुक्त राष्ट्र संघाचे (‘युनो’चे) सदस्य बनवले गेले. त्यापूर्वी ‘कॉमनवेल्थ’चे सदस्यत्व देणे हीसुद्धा योजनेच्या अंतर्गत असलेली चाल होती.

१७. वर्ष १९४६ मध्ये राज्यघटना समितीची (संविधान सभेची) स्थापना करून नवीन राज्यघटना बनवण्याच्या प्रक्रियेचा आरंभ करण्यात आला.

१८. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताची फाळणी करून तथाकथित स्वातंत्र्य देण्यात आले. खरेतर ते स्वातंत्र्य म्हणजे केवळ ‘सत्तेचे हस्तांतर’ होते.

१९. ऋषिमुनींनी ४ पुरुषार्थांच्या बळावर आदर्शवत् राज्यघटना निर्माण केली होती, ती रहित करून अनात्मवाद (आत्म्याचे अस्तित्व न मानणारा जडवाद) आणि भौतिकवाद यांच्या आदर्शावर आधारलेली नवीन राज्यघटना निर्माण करण्यात आली. ती राज्यघटना देशाने वर्ष १९५० मध्ये स्वीकारली.

भारतीय प्रजेच्या जीवनशैलीत पालट करण्याची नियोजनबद्ध योजनाही व्हॅटिकनची चर्चची सत्ता स्थापित करण्याच्या योजनेचाच भाग होती. त्याचे बीज अकबर बादशहाच्या काळात रोवण्यात आले होते. त्यामुळे इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये अकबर बादशहाला ‘अकबर द ग्रेट’ (महान अकबर) असे म्हणून गौरवण्यात आले. आपण आधी होतो, तेवढेच आज परतंत्र आहोत. त्याची प्रत्यक्ष रूपरेषा, म्हणजेच भारताची ही नवीन राज्यघटना आहे.’

(साभार : विनियोग परिवार, बी/२- १०४, वैभव अपार्टमेंट, जांबली गली, बोरीवली (पश्चिम), मुंबई- ९२)