रत्नागिरीत रत्नदुर्गावर होणार ध्वजारोहण

आज महाराष्ट्रातील ३५० गड-दुर्ग यांवर फडकणार तिरंगा आणि भगवा ध्वज

रत्नागिरी –  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला यावर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात हे वर्ष शिवराज्याभिषेक वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघानेही’ हे वर्ष साजरे करण्यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी २६ जानेवारी या दिवशी गड-दुर्ग यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून भगवा आणि तिरंगा ध्वज फडकावणार आहेत.

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने निवडून दिलेल्या संस्थाकडून निवडून दिलेल्या गड-दुर्ग यांवर ध्वजारोहण होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी या संस्थेने महाराष्ट्रातील सर्व दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी यांना आवाहन केले होते. या आवाहानाला प्रतिसाद देत ५ सहस्रांहून अधिक शिवप्रेमींनी नाव नोंदणी केली आहे.

रत्नागिरीतील रत्नदुर्ग

या नावांचा आढावा घेऊन संस्थांना अखिल महाराष्ट्र महासंघाच्या प्रमुख संघामार्फत सर्व  समन्वयकांपर्यंत भगवा ध्वज, तिरंगा ध्वज आणि शिवप्रतिमा पोचवण्यात आली आहे. रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स या संस्थेकडून रत्नगिरीतील रत्नदुर्गावर ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे भगवती मंदिर संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोंडकर असणार आहेत. ‘या कार्यक्रमाकरता रत्नागिरीतील सर्व शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी यांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे’, असे आवाहन रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र वणजू आणि सचिव गौतम बाष्टे यांनी केले आहे.