…हा नवीन भारताचा प्रारंभ आहे !

पंतप्रधान श्रीरामा चरणी नतमस्तक होतांना

२२ जानेवारी २०२४ या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी श्रीरामाच्या चरणी  विनम्रतापूर्वक क्षमा मागणे, ही केवळ त्यांची भावना नाही, तर कोट्यवधी हिंदूंच्या मनातील भावना आहे. मोदी यांनी त्यांचा पदाचा, अधिकाराचा विचार न करता किंवा कुठलाही अहंकार मनाला न शिवू देता एका श्रद्धेय हिंदूच्या नात्याने ती पूर्ण देशाच्या वतीने श्रीरामाच्या चरणी पोचवली आहे. ‘प्राणप्रतिष्ठेचे यजमानपद भूषवतांना या सोहळ्याचे गांभीर्य जाणून स्वत:चे शरीर आणि मन यांची शुद्धी व्हावी; म्हणून ११ दिवस अनुष्ठान – उपवास करणारे पंतप्रधान आपल्याला लाभले’, हे या देशाचे भाग्य आहे. त्यांच्या जागी सांप्रत काळातील कुणी अन्य व्यक्ती पंतप्रधान असती, तर क्वचितच इतक्या गांभीर्याने हिंदूंच्या प्रथा-परंपरांचा आदर आणि आचरण केले गेले असते. आज सर्व वृत्तवाहिन्यांवर हिंदु धर्माची महती, हिंदूंचे सण आणि आचरण यांविषयी पुष्कळ दाखवले जाते; पण वर्ष २०१४ पूर्वी हे चित्र नव्हते. हिंदू समाजच सदैव एका अपराध गंडात असायचा. ‘आपण ‘हिंदु’ म्हणून जन्मलो, म्हणजे काही तरी पाप केले’, अशी एकूण भावना असायची. हिंदूंच्या देशात बहुसंख्य हिंदू असूनही हिंदू मान खाली घालून असायचा. गेल्या ९ वर्षांत ही स्थिती पुष्कळ सकारात्मकरित्या पालटली आहे. नेता धर्मप्रेमी आणि धर्माचरणी असला की, जनतासुद्धा तशीच बनते. आज गावोगावी, रस्त्यारस्त्यांवर लोक श्रीरामाचे स्वागत मनापासून आणि उघडपणे करत आहेत. कधी काळी व्यापारावर परिणाम होईल; म्हणून स्वतःतील हिंदुत्व झाकणारे व्यापारी आज मनापासून दुकानांवर भगवा झेंडा लावत आहेत. हिंदु न्यूनगंडातून बाहेर येणे, हे येणार्‍या काळासाठी पुष्कळ आश्वासक आहे. ‘श्रीराममंदिर उभे राहिले, म्हणजे सगळे झाले’, असे मुळीच नाही. हा नवीन भारताचा प्रारंभ आहे. आता  हे रामराज्य घडवण्याची, वाढवण्याची, टिकवण्याची आणि वैयक्तिक जीवनात मर्यादापुरुषोत्तमाचे गुण अंगीकारण्याची, म्हणजेच धर्माचरण करण्याचे उत्तरदायित्व समस्त हिंदूंचे आहे !

– श्री. अनिकेत शेटे, चिंचवड, जिल्हा पुणे. (२२.१.२०२४)