संपादकीय : पाकवरील ‘स्ट्राईक’ !

क्षेपणास्त्रे द्वारे केलेले आक्रमण

पाकमधील बलुचिस्तान भागातील तुरबत आणि पंचकूर या आतंकवाद्यांच्या २ तळांवर इराणने १७ जानेवारीला आक्रमण केले. जैश-अल-अलद या संघटनेच्या तळावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे यांद्वारे केलेले हे आक्रमण पाक अन् भारतातील पाकप्रेमी या दोघांनाही चांगलीच चपराक आहे. या आक्रमणाने पाकमध्ये आतंकवाद्यांचे तळ कसे भरभरून फळतात, फुलतात याचे आणखी एक उदाहरण जगासमोर आल्याने पाक चांगलाच चिडला आहे. पाक आणि इराण या दोघांच्या मध्ये सुमारे ९५९ कि.मी.ची सामाईक सीमा आहे. इराणच्या म्हणण्यानुसार पाकमधील हा आतंकवादी सुन्नी गट शियांचे राष्ट्र असलेल्या इराणमधील सिस्तान या प्रांतावर हक्क गाजवण्यासाठी सतत आतंकवादी कारवाया करतो. इराणच्या सीमावर्ती सुरक्षासैनिकांवर आक्रमण करतो. मागील मासात या आतंकवाद्यांनी इराणच्या सैन्यावर आक्रमण करून इराणचे ११ अधिकारी मारले. इराणच्या आक्रमणाने आतल्या आत जळफळाट होत असलेल्या पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने या आक्रमणाचा निषेध करून ‘इराणला याची गंभीर फळे भोगावी लागतील’, असे रागारागाने म्हटले आहे. तसेच इराणच्या राजदूताला बोलावून अप्रसन्नता व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात पाकची स्थिती एवढी दयनीय आहे की, आतंकवाद्यांच्या साहाय्याविना तो काहीच करू शकत नाही. या आक्रमणात १०० हून अधिक लोक घायाळ झाल्याचे वृत्त आहे. इराणमधील असंतुष्ट अल्पसंख्यांक सुन्नी समाजाला हे आतंकवादी हाताशी धरून आहेत. इराणने प्रथमच असा ‘सर्जिकल स्ट्राईक’ पाकवर केला असून त्याने केवळ आतंकवाद्यांनाच लक्ष्य केल्याचे म्हटले आहे.

भारतात सर्व प्रकारचे जिहाद पसरवून भारताला आंतर्बाह्य पोखरणार्‍या; भारतात बाँबस्फोट, दंगली, हिंदूंच्या हत्या, मुलींचे अपहरण आदी सारे करून हिंदूंचा वंशविच्छेद करवणार्‍या; काश्मीरला उद्ध्वस्त करणार्‍या, सहस्रो सैनिकांचे हाकनाक प्राण घेणार्‍या, भारतावर ३ युद्धे लादणार्‍या पाकमधील आतंकवादी तळांवर मोदी शासनाने ‘सर्जिकल स्ट्राईक’चे उत्तम हत्यार वापरले. त्या वेळी भारतातील पाकप्रेमी पुरोगामी, निधर्मी साम्यवादी आणि काँग्रेसचे नेते यांनी मोदी शासनावर तोंडसुख घेऊन गरळओक केली. अमेरिकेसह पाकप्रेमी भारतियांनी पाकची बाजू घेतली होती. आता गंमत अशी झाली आहे की, जैश-अल-अलद या आतंकवादी संघटनेने स्वतःच ती पाकस्थित आतंकवादी संघटना असून इराणवर केलेल्या आक्रमणात ५ मुले मारली गेल्याचे घोषित केले आहे आणि इराणने त्यांच्या तळांवर आक्रमण केल्याचेही घोषित केले आहे. पाकच्या निर्मितीपासून पाकने आतंकवाद पोसला. ‘करावे तसे भरावे’ यानुसार पाकला त्याचे परिणाम भोगावे लागतील, हे निश्चित !