मुंबई उच्च न्यायालयाकडून ठाकरे गट आणि राहुल नार्वेकर यांना नोटीस

८ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश 

मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या १४ आमदारांना पात्र ठरवल्याने शिवसेनेने माजी मुख्यमंत्री ठाकरे यांना शह देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या १४ आमदारांना पात्र ठरवले होते; मात्र ‘या आमदारांनी पक्षादेशाचा भंग केला असल्याने त्यांना अपात्र ठरवावे’, अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी केली. या याचिकेवर सुनावणी घेताना मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे गट आणि राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे. येत्या ८ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

न्यायमूर्ती गिरीश एस्. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पी. पुनीवाला यांच्या खंडपिठासमोर शिंदे गटाच्या याचिकेवर सुनावणी झाली. ‘सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करत आहे का ?’, अशी विचारणाही खंडपीठाने याचिकाकर्त्यांकडे केली.

उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली !

मुंबई – शिवसेनेतील फुटीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या सूत्राच्या बाहेर जाऊन निर्णय दिल्याने त्याला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका ठाकरे गटाच्या वतीने १५ जानेवारी या दिवशी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी १८ जानेवारी या दिवशी ठेवण्यात आली होती. आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.  आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचे सांगितले होते. दोन्ही गटांच्या आमदारांना पात्र ठरवले होते. नार्वेकर यांच्या निकालाच्या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.