पंतप्रधानांच्या नाशिक दौर्‍याच्या खर्चाचा हिशोब शासनाने मागितला !

शहर सुशोभीकरणावर झाला कोट्यवधी रुपयांचा व्यय !

नाशिक –  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक दौर्‍यासाठी शहर सुशोभीकरणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. आठ ते दहा दिवस शहारात स्वच्छता, रंगरंगोटी, सजावट आदींवर हा खर्च झाला आहे. मर्जीतील ठेकेदारांना यासाठी पैसे देण्यात आल्याची चर्चा आहे. या सर्व खर्चाचा हिशोब पंतप्रधान कार्यालयासह मुख्यमंत्री कार्यालयाकडून मागवण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेतील अधिकार्‍यांची हिशोब जुळवतांना तारांबळ उडाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन, रोड शो, काळाराम मंदिराला भेट, गोदाकाठाची पहाणी असे कार्यक्रम पंतप्रधानांच्या ४ घंट्यांच्या दौर्‍यात होते. त्यासाठी हेलिपॅडपासून ते मोदी मैदानापर्यंत जाणारे रस्ते चकचकीत करण्यात आले. क्रीडा विभागाला ५२ कोटी रुपयांचा निधी संमत झाला; त्यातून शहरात विविध प्रकारची कामे करण्यात आली. ‘रोड शो’च्या दरम्यान झाडांवर झेंडूच्या फुलांच्या माळा लावणे, रस्ते दुरुस्ती करणे, नवीन रस्ते सिद्ध करणे, गोदाघाट परिसरात रामायणातील प्रसंगांची चित्रे रंगवणे, नदीच्या घाटाची स्वच्छता, दुभाजकांची रंगरंगोटी,  एलईडी दिवे, कृत्रिम लॉन, सजावट करणे, पाण्याने रस्ते धुणे, वाहतूक बेटांची साफसफाई, बोर्ड रंगवणे, होर्डिंग्ज लावणे आदी कामे करण्यात आली.