नागपूर येथे आणखी २५ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार !

वस्त्रसंहितेचे फलक घेऊन उभे असलेले मंदिरांचे विश्वस्त

(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)

नागपूर, १६ जानेवारी (वार्ता.) – येथील सेमिनरी हिल्स, मानवसेवा नगरच्या हिलटॉप श्री दुर्गामाता मंदिर येथे शहरातील मंदिर विश्वस्तांची बैठक पार पडली. या बैठकीत नागपूर येथील आणखी २५ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला ९ मंदिरांचे २५ विश्वस्त उपस्थित होते.

  • मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत निर्णय !
  • आतापर्यंत ४७ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू !

४ फेब्रुवारी या दिवशी श्रीराम सभागृह, नागपूर येथे होणार्‍या ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशना’ची माहिती देण्यासाठी हिलटॉप श्री दुर्गामाता मंदिराच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीला या अधिवेशनासंबंधी माहिती देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. आतापर्यंत नागपूर येथे एकूण ४७ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झालेली आहे. बैठकीला संबोधित करतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. विद्याधर जोशी म्हणाले, ‘‘मंदिरे हिंदु संस्कृतीचा पाया आहेत. पाया भक्कम असणे आवश्यक आहे; परंतु सद्यःस्थितीत मंदिरे दिशाहीन आहेत. त्यांच्या समस्या समोर येत नाहीत. मंदिरांच्या समस्या दूर होऊन मंदिरे सक्षम व्हावीत आणि पुन्हा हिंदूंसाठी मार्गदर्शक केंद्रे व्हावीत यासाठी मंदिरांचे संघटन होणे आवश्यक आहे.’’

बैठकीला उपस्थित असलेले मंदिरांचे विश्वस्त

या वेळी श्री. दिलीप कुकडे यांनी उपस्थित विश्वस्तांना अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन केले. भाजपचे माजी नगरसेवक श्री. नरेश बेर्डे यांनी २५ मंदिरांसाठी वस्त्रसंहितेचे मोठे फलक सिद्ध करून दिले. हिलटॉप दुर्गामाता मंदिराच्या वतीने त्यांचे वाटप करण्यात आले. या बैठकीला महाराष्ट्र मंदिर महासंघाचे नागपूर जिल्हा निमंत्रक श्री. दिलीप कुकडे, अधिवक्ता ललित सगदेव, माजी नगरसेवक श्री. नरेश बेर्डे आणि सुनील अग्रवाल उपस्थित होते.

क्षणचित्र

उपस्थित मंदिर विश्वस्तांनी ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशना’साठी नावनोंदणी केली. मंदिर विश्वस्तांचा परस्पर परिचय होऊन संपर्क यंत्रणा निर्माण व्हावी, यासाठी विविध भागांतील मंदिर विश्वस्तांसाठी ठिकठिकाणी बैठकांचे आयोजन करण्याचे ठरले.


नागपूर येथील ‘मंदिर न्यास अधिवेशना’ला सर्व मंदिरांचे विश्वस्त आणि प्रतिनिधी यांना येण्याचे आवाहन !

नागपूर मंदिर न्यास परिषदेला उपस्थित असलेले मंदिरांचे विश्वस्त आणि प्रतिनिधी

नागपूर, १६ जानेवारी (वार्ता.) – येथील श्री रमणा मारुति मंदिरात नुकतीच नागपूर मंदिर न्यास परिषदेची निमंत्रण बैठक पार पडली. या बैठकीत २५ ते ३० मंदिर विश्वस्त आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या अंतर्गत येथील श्री रमणा मारुति मंदिराचे विश्वस्त श्री. राजेश धांडे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. या बैठकीत २५ मंदिरांचे विश्वस्त आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते. मंदिरांचे उपस्थित विश्वस्त आणि प्रतिनिधी यांनी अधिवेशनाला येण्याविषयी सकारात्मकता दर्शवली, तसेच नावनोंदणी अर्ज भरून दिले. बैठकीचे आयोजन हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल अर्वेन्ला यांनी केले होते. या परिषदेला सर्व मंदिरांचे विश्वस्त आणि प्रतिनिधी यांनी यावे, असे आवाहन नागपूर मंदिर न्यास परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

क्षणचित्र

‘संपर्कातील अन्य मंदिरांनाही हा विषय सांगून या परिषदेला येण्याविषयी पुढाकार घेऊन बैठक घेऊ’, असे उपस्थित मंदिरांचे विश्वस्त आणि प्रतिनिधी यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका :

हिंदूंच्या मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी सरकारने राष्ट्रीय स्तरावर सर्वच मंदिरांसाठी वस्त्रसंहिता लागू करणे आवश्यक !