अयोध्या हे फार पूर्वीपासून श्रद्धेचे केंद्र आहे; पण मोगलांच्या आक्रमणानंतर येथील चित्र पूर्ण पालटून श्रद्धेला ठेच पोचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला. या काळात अनेक मठांचे मठाधिपती आणि मंदिरांचे अन् पुजारी यांनी देवतेची मूर्ती वाचवण्यासाठी शरयू नदीत विसर्जन करणे चांगले मानले. अशा परिस्थितीत सनातन धर्मावरील मोगलांचे आक्रमण रोखण्यासाठी एका पुरोहिताने पुढाकार घेतला. अयोध्येत मोगल सैन्याविरुद्ध लढणार्या त्या शूर योद्ध्याचे नाव देवीदिन पांडे. या नावाच्या परिचयाची वेगळी आवश्यकता नाही. त्यांनी मीर बांकीच्या सैन्याचा एकट्याने पराभव केला. बाबरने त्याच्या आत्मचरित्रात लिहिले आहे, ‘एकट्या देवीदिनने ७०० मोगल सैनिक मारले…’
१. सूर्यवंशी क्षत्रियांचे पुजारी देवीदिन पांडे यांची माहिती
मीर बांकीच्या सैन्याशी लढणारे अयोध्येचे देवीदिन पांडे हे सूर्यवंशी क्षत्रियांचे पुजारी होते. मलखांब, कुस्ती यांखेरीज त्यांना शस्त्रास्त्रांचा वापर करण्यासह शास्त्राचीही आवड होती. त्यांच्या विद्वत्तेची आणि शौर्याची दूरदूरपर्यंत चर्चा होती. देवीदिन पांडे हे धार्मिक ब्राह्मण कुटुंबातील होते.
२. मीर बांकीने तोफा लावून राममंदिर पाडणे !
बंगालचा सुलतान जलालशाहाच्या कृतीमुळे देवीदिन पांडे यांचे रक्त उसळले. जेव्हा जेव्हा अयोध्येचा इतिहास सांगितला जातो, तेव्हा देवीदिन पांडे यांचे नाव ‘योद्धा’ म्हणून घेतले जाते. हॅमिल्टन बाराबंकी ‘गॅझेटियर’मध्ये लिहितात, ‘२१ मार्च १५२८ या दिवशी बाबरने मीर बांकी या आपल्या सेनापतीच्या नेतृत्वाखाली चारही बाजूनीं तोफा लावून श्रीराममंदिर उद्ध्वस्त केले. बाबर एवढ्यावरच थांबला नाही, तर मशिदीसाठी बनवलेल्या विटांमध्ये त्याने पाण्याऐवजी हिंदु योद्ध्यांच्याच रक्ताचा वापर केला. ही पवित्र अयोध्या किती रक्ताने रंगली असेल, यावरून त्याची कल्पना येईल.’
३. मोगल सैन्याचा सामना करण्यासाठी देवीदिन पांडे यांनी सैन्य सिद्ध करणे
या वेळी श्रीरामजन्मभूमीवरील मंदिर पाडल्याची बातमी वार्यासारखी पसरली. सूर्यवंशी क्षत्रियांचे पुजारी देवीदिन पांडे यांनी हे ऐकताच त्यांच्या रक्ताच्या उकळ्या फुटल्या. मोगल आक्रमणापासून हिंदु मंदिरे आणि सनातन धर्म यांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी पुरोहित कर्तव्ये पाळली अन् क्षत्रियांच्या हाताखाली ढाल म्हणून काम करण्यासाठी मोगल सैन्याचा सामना करण्यासाठी एकटेच पुढे आले. देवीदिन पांडे यांनी गावातील लोकांमध्ये नवी स्फूर्ती आणि नवचेतना भरली. परिणामी ९० सहस्र गावकर्यांची फौज सिद्ध केली आणि मीर बांकीच्या सैन्याचा सामना करण्यासाठी ते निघाले. इतिहासकारांच्या मते पुजारी देवीदिन पांडे यांनी तलवार हाती घेतली, तेव्हा क्षत्रियांनीही त्याला साथ दिली. मोगल सैन्याचा सामना करण्यासाठी मोठ्या संख्येने सूर्यवंशींनी बाबरच्या वजीर मीर बांकी ताश्कंदच्या सैन्याला वेढा घातला. सर्वांनी ‘महादेवा’चा जयघोष करत मोगल सैन्यावर आक्रमण केले. इथे पुष्कळ रक्त सांडले होते.
४. श्रीराममंदिरासाठी देवीदिन पांडे यांचे समर्पण
हे युद्ध ५ दिवस अहोरात्र चालले; पण फितूरीने घात केला. या युद्धाचे नेतृत्व करणार्या देवीदिन पांडे यांना त्यांच्याच अंगरक्षकाने वीट फेकून मारली आणि घायाळ केले. ही संधी साधून मीर बांकीने देवीदिन पांडे यांच्या छातीत गोळी घातली. या ९० सहस्र सैन्यांच्या रक्ताची समिधा पुन्हा एकदा स्वाभिमानासाठी वाहिली गेली. श्रीराममंदिरासाठी हे तिसरे समर्पण ठरले.
(साभार : विविध संकेतस्थळे)