Swami Rambhadracharya Maharaj : पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठी स्वामी रामभद्राचार्य महाराज करत आहेत यज्ञ !

स्वामी रामभद्राचार्य महाराज

अयोध्या (उत्तरप्रदेश) – आम्ही पाकव्याप्त काश्मीर भारताला परत मिळावा; म्हणून यज्ञ प्रारंभ केला आहे. त्रेतायुगानंतर आताचा निष्काम यज्ञ आहे. प्रत्येक यज्ञ कुठल्या तरी विशिष्ट इच्छेने केला जातो; मात्र आमची इच्छा इतकीच आहे की, पाकव्याप्त काश्मीरचा समावेश भारतात व्हावा. आम्हाला निश्‍चिती आहे की, पाकव्याप्त काश्मीर भारतात समाविष्ट होईल. श्री हनुमानावर आमची प्रगाढ श्रद्धा आहे. श्री हनुमानाने माता सीतेचा शोध घेतला, त्यांना परत आणण्यासाठी प्रभु श्रीरामाचे साहाय्य केले. एवढे मोठे कार्य करणार्‍या श्री हनुमानासाठी पाकव्याप्त काश्मीर भारतात समाविष्ट करणे काय मोठी गोष्ट आहे? ते आपली भूमीही परत आणतील, असे विधान स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी केले आहे.

स्वामी रामभद्राचार्य महाराज पुढे म्हणाले की, रामललाची प्राणप्रतिष्ठा शास्त्रानुसारच होत आहे. श्रीराममंदिराचा गाभारा बांधला गेला आहे. तो अर्धवट नाही. त्यामुळे तिथे प्राणप्रतिष्ठा होते आहे. आता श्रीरामाचे बाहेरील मंदिर बांधले होईल. पुनर्वसु नक्षत्रदेखील आहे, त्रेताची छायाही आहे. योग्य वेळी श्रीरामाची प्रतिष्ठापना होते आहे. ‘आपल्या देशाचे पंतप्रधान ११ दिवस केवळ दुग्ध आहार करत आहेत. ११ दिवस ते अन्नग्रहण करणार नाहीत. असे पंतप्रधान तुम्ही पाहिले आहेत का?’, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला.