भारतीय संस्कृतीचा जागतिक सन्मान !

मॅग्नस कार्लसेन यांच्या समवेत पारितोषिक दाखवतांना  ब्रिस्टी मुखर्जी

कोलकाता येथे पार पडलेल्या ‘टाटा स्टील चेस इंडिया फेस्टिव्हल’मध्ये ‘ऑल इंडिया वुमन रॅपिड गटा’त भारताची ब्रिस्टी मुखर्जी या तरुण महिला खेळाडूने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी ब्रिस्टी हिने भारतीय संस्कृतीला अनुसरून एक महत्त्वपूर्ण कृती केली. बुद्धीबळपटूंच्या जागतिक क्रमवारीत सध्या अग्रक्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसेन या नामांकित खेळाडूकडून बक्षीस स्वीकारतांना त्याच्या पायाला हात लावून, म्हणजेच वाकून नमस्कार केला. भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने ही कृती साधी; पण महत्त्वपूर्ण असलेच्या कृतीचा क्षण सध्या चर्चेचा विषय झाली आहे. या वेळी व्यासपिठावर उपस्थित असलेले भारताचे प्रसिद्ध बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांनाही वाकून नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. या कृतीने केवळ तिने तिच्या विनयशीलतेचे दर्शन घडवले नाही, तर भारतीय संस्कृतीतील नम्रतेचा आणि आदरभावनेचा जागतिक स्तरावर सन्मान केला.

१. भारतीय परंपरेतून सकारात्मक संदेश

भारतीय परंपरेत ‘नमस्कार’ ही केवळ एक शिष्टाचाराची कृती नसून ती मानवी कृतज्ञता, आदर आणि विनम्रता यांचे प्रतीक आहे. ज्येष्ठ, गुरु किंवा आदरणीय व्यक्तींना नमस्कार करून आदर व्यक्त करण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे. ही कृती व्यक्तीचे संस्कार आणि सभ्यता यांचा आरसा असते. एका युवा खेळाडूकडून ही परंपरा जपली जाणे विशेष कौतुकास्पद आहे. जागतिक स्तरावर जिथे बर्‍याच वेळा पारंपरिक मूल्ये मागे पडतांना दिसतात, तिथे भारतीय मूल्यांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या अशा कृती सकारात्मक संदेश देतात.

२. ब्रिस्टी हिने केलेली कृती ही भारतीय संस्कृतीचा सन्मान जागतिक स्तरावर करणारी !

ब्रिस्टी हिने केलेली कृती केवळ एक व्यक्तीगत कृती नव्हती, तर ती संपूर्ण भारतीय समाजाच्या विचारसरणीचे प्रतिनिधीत्व करणारी होती. पुरस्कार देणार्‍या व्यक्तीला वाकून नमस्कार करणे, म्हणजे केवळ आदर व्यक्त करणे नाही, तर त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाला आणि मार्गदर्शनाला मान्यता देणे आहे. या कृतीतून युवा पिढीला नम्रतेचा आणि आपल्या मूळ संस्कृतीशी जोडून रहाण्याचा संदेश मिळतो. आज जागतिक स्तरावर भारतीय खेळाडू केवळ त्यांच्या कौशल्यानेच नव्हे, तर त्यांच्या वर्तनानेही लक्ष वेधून घेत आहेत. ब्रिस्टी हिच्या कृतीने भारतीय संस्कृतीचा सन्मान जागतिक स्तरावर वाढवला आहे. तिच्या या कृतीची सामाजिक माध्यमांवर प्रचंड प्रशंसा झाली आणि अनेकांनी ‘ही कृती अनुकरणीय आहे’, असे म्हटले. खेळ ही एक अशी जागा आहे, जिथे विविध संस्कृतींची देवाणघेवाण होते आणि ब्रिस्टी हिने अशी कृती करून भारतीय संस्कृती सन्मानाने सादर केली आहे.

३. युवा पिढीने भारतीय मूल्यांचाही सन्मान जपावा !

सध्याच्या युगात जिथे यशाचा आणि प्रसिद्धीचा पाठलाग अधिक दिसतो, तिथे नम्रता अन् आदरभाव जपणे, हे मोठे ठरते. ब्रिस्टी हिने आपल्याला दाखवून दिले की, यश मिळाल्यानंतरही माणूस प्रत्यक्ष कार्यस्तरावर जोडलेला राहू शकतो. तिची कृती प्रत्येक युवा खेळाडू आणि विद्यार्थी यांच्यासाठी एक आदर्श आहे. आपल्या संस्कृतीचे पालन करतांनाच यशस्वीपणे जगाच्या पाठीवर पोचता येते, हे या कृतीतून अधोरेखित होते. अशा कृतींमुळे केवळ व्यक्तीच नव्हे, तर देशाचाही गौरव होतो. युवा पिढीने या कृतीतून प्रेरणा घेऊन आपल्या कर्तृत्वासह भारतीय मूल्यांचा सुद्धा सन्मान जपावा, हीच या प्रसंगाची शिकवण आहे.

– श्री. अनिकेत शेट्ये, चिंचवड, जिल्हा पुणे.