सिंधुदुर्ग : बगलमार्गावरील दुभाजक फोडणार्‍यांवर कारवाई न झाल्यास उपोषण करणार ! – रवींद्र केरकर, उपसरपंच, इन्सुली

सावंतवाडी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या झाराप-पत्रादेवी बगलमार्गावर दोन्ही बाजूंनी अनेक व्यवसाय चालू आहेत. यातील काही व्यावसायिकांनी महामार्गावरील दुभाजक फोडून जा-ये करण्यासाठी मार्ग बनवला आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. त्यामुळे महामार्गावर अवैधरित्या दुभाजक फोडणार्‍यांवर कारवाई करा, अन्यथा २६ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करू, अशी चेतावणी इन्सुलीचे माजी उपसरपंच रवींद्र केरकर यांनी विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे दिली आहे.

झाराप ते पत्रादेवी महामार्गावर ठिकठिकाणी दुभाजक फोडून व्यावसायिकांनी स्वत:च्या सोयीसाठी जवळचा मार्ग केला आहे. त्यामुळे महामार्गावर दगड-माती येऊन अपघात होत आहेत. यापूर्वीही अनेक अपघात होऊन जीवित आणि वित्त हानी झाली आहे. त्यामुळे २६ जानेवारीपर्यंत संबंधितांवर कारवाई न झाल्यास उपोषण करणार असल्याचे केरकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

हे प्रशासनाला का समजत नाही ? अशी चेतावणी का द्यावी लागते ?