Naming Children Hindu scriptures : मुलांची नावे ठेवतांना हिंदु धर्मग्रंथातील नावे निवडावीत ! – स्वामी विश्‍वप्रसन्न तीर्थ, पेजावर मठ

पेजावर मठाचे स्वामी विश्‍वप्रसन्न तीर्थ

बेंगळुरू – हिंदु पालकांनी त्यांच्या मुलांची नावे ठेवतांना वेद, रामायण, महाभारत आणि पुराणे यांतून नावे निवडावीत. यामुळे मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख होईल. मोठ्या प्रमाणावर मुलांची (अयोग्य) नावे पालटण्याची मोहीम हाती घ्यायला हवी. आपण (हिंदू) येथे कायमस्वरूपी रहाणार नाही. त्यामुळे आपण आपल्या मुलांवर सनातन धर्माचे संस्कार करणे आवश्यक आहे. येणार्‍या संततीवर संस्कृतीचे संस्कार केले, तर हिंदु धर्माचे रक्षण होईल, असे वक्तव्य पेजावर मठाचे स्वामी विश्‍वप्रसन्न तीर्थ यांनी केले.

श्रीराममंदिराचे संवर्धन, हे हिंदूंवर असलेले मोठे दायित्व !

ते पुढे म्हणाले की, अयोध्येत श्रीराममंदिर उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. असे असले, तरी आपले दायित्व संपले, असे हिंदूंनी समजू नये. भविष्यात या मंदिराला कुणीही हानी पोचवू शकणार नाही, एवढी पत निर्माण करणे, याचे दायित्व हिंदूंचे आहे. जोपर्यंत भारतात हिंदू बहुसंख्य आहेत, तोपर्यंत हे मंदिर अस्तित्वात राहील. अफगाणिस्तानमध्ये काय झाले, हे आपण पहात आहोत. तेथे जिहादी आतंकवाद्यांनी बुद्धाची मूर्ती नष्ट केली. त्यामुळे मंदिर उभारणे, ही कठीण गोष्ट नाही,  तर त्याचे संवर्धन करणे, ही कठीण गोष्ट असून त्याचे मोठे दायित्व हिंदूंवर आहे.