उज्जैन (मध्यप्रदेश) – श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्या येथील महाकालेश्वर मंदिराकडून ५ लाख लाडू पाठवण्यात येणार आहेत. २५० क्विंटल वजनाचे हे लाडू ५ दिवसांत बनवण्यात येणार आहेत. हे लाडू भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहेत. याविषयीची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केली. या लाडूंसाठी १ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. एका लाडूचे वजन ५० ग्रॅम असेल. हे लाडू बनवतांना पाण्याचा वापर केला जात नाही.
२० वर्षांपासून लाडू प्रसाद बनवणारे राजू हलवाई यांनी सांगितले की, लाडू बनवण्यापूर्वी २० किलो देशी तुपात २० किलो बेसन आणि ५ किलो रवा मिसळून चुलीच्या मोठ्या आचेवर भाजले जाते. ही प्रक्रिया दीड ते २ घंटे चालू रहाते. स्वयंपाक करतांना हे मिश्रण एका लाडूमध्ये सतत मिसळले जाते. यानंतर बेसन एका मोठ्या ट्रेमध्ये ठेवून थंड केले जाते, या प्रक्रियेला २४ घंटे लागतात. थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलची आणि सुकामेवा घालतात. अशा प्रकारे लाडूचे मिश्रण बनवले जाते.