भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभे रहावे, अशी नियतीचीच इच्छा होती आणि त्यासाठी तिनेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड केली ! – लालकृष्ण अडवाणी

लालकृष्ण अडवाणी

नवी देहली – अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभे रहावे, अशी नियतीचीच इच्छा होती आणि त्यासाठी तिनेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड केली, असे विधान श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनातील भाजपचे प्रमुख नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केले आहे. १६ जानेवारीला प्रकाशित झालेल्या ‘राष्ट्रधर्म’ या नियतकालिकात अडवाणी यांनी लिहिलेल्या लेखात हे विधान केले आहे. ‘राम मंदिर निर्माण, एक दिव्य स्वप्न की पूर्ती’ असे या लेखाचे नाव आहे. सध्या ९६ वर्षांचे असणारे अडवाणी २२ जानेवारीला श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित रहाणार आहेत.

सौजन्य : झी बिझनेस 

लालकृष्ण अडवाणी यांनी लिहिले आहे की, नरेंद्र मोदी संपूर्ण रथयात्रेत माझ्यासमवेत होते. त्या वेळी ते फारसे प्रसिद्ध नव्हते; मात्र त्याच वेळी प्रभु श्रीरामानेच त्याच्या भक्ताची (मोदी यांची) मंदिर उभारणीसाठी निवड केली. ‘अयोध्येमध्ये भव्य श्रीराममंदिर उभे रहावे, असे नियतीनेच ठरवले आहे’, अशी जाणीव मला त्या वेळी झाली.

मोदी जेव्हा श्रीराममूर्तीची प्रतिष्ठापना करतील, तेव्हा ते देशातील प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करतील. हे मंदिर प्रभु श्रीरामाचे गुण अंगीकारण्यासाठी सर्व भारतियांना सदैव प्रेरणा देत राहो, अशी मी प्रार्थना करतो.