सांगली येथे १ सहस्र २०० कडव्या-लढवय्या शीख तरुणांचा हिंदु एकता आंदोलन संघटनेमध्ये प्रवेश !

हिंदु एकता आंदोलन शीख बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे ! – नितीन शिंदे, अध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन

हिंदु एकता आंदोलन संघटनेत प्रवेश करणार्‍या शीख बांधवांचा सत्कार करतांना श्री. नितीन शिंदे (उजवीकडे)

सांगली, १२ जानेवारी (वार्ता.) – महाराष्ट्र युवा प्रदेश उपाध्यक्ष अमित सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील यांच्यासह आबा धोत्रे आणि झोपडपट्टी परिसरातील शीख बांधवांची नुकतीच एक बैठक हिंदु एकता आंदोलनाचे नूतन प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांच्या समवेत त्यांच्या घरी ११ जानेवारी या दिवशी पार पडली. या वेळी गुरुसिंह, भगतसिंह, सुरजसिंह, गोविंदसिंह, शक्तीसिंह आदींसह शिखांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते अशा एकूण २०० शीख बांधवांनी हिंदु एकता आंदोलन या संघटनेत प्रवेश केला.

या वेळी शीख बांधवांनी असा निर्धार व्यक्त केला की, हिंदुत्वाची सर्व शक्ती एकवटून आम्ही लवकरच प्रभाग क्रमांक ९ मध्ये हिंदु एकता आंदोलनाची पहिली शाखा काढणार आहोत. हिंदु एकता आंदोलनाच्या ‘सर्व जाती विसरून हिंदु सारे एक होऊ’ या बोधवाक्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानून हिंदु एकता आंदोलनाचे कार्य सक्रीयपणे करणार आहोत.

नितीन शिंदे म्हणाले की, हिंदु एकता आंदोलनाच्या स्थापनेपासून सांगली येथे मी नूतन प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच २०० शीख बांधवांचा मोठ्या प्रमाणात हा प्रवेश झाला आहे. त्यामुळे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, तसेच हिंदु एकता आंदोलन हे नेहमी शीख बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. लवकरच सांगली येथे विविध भागांमध्ये हिंदु एकता आंदोलन संघटनेच्या शाखांचे मोठ्या प्रमाणात उद्घाटन होईल.