अजित पवार यांच्या घोटाळ्यांना भाजप संरक्षण देत आहे ! – शालिनीताई पाटील, माजी मंत्री

४ मासांत अजित पवार कारागृहात जातील !

शरद पवार, अजित पवार आणि शालिनीताई पाटील

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांना २५ सहस्र कोटींच्या शिखर बँक घोटाळ्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचवले, तर ७० सहस्र कोटी रुपयांच्या जलसिंचन घोटाळ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी वाचवत आहेत. नरेंद्र मोदी यांनी त्यांना भाजपसमवेत घेऊन संरक्षण दिले आहे, असा गंभीर आरोप माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी केला आहे. शालिनीताई पाटील यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात हे आरोप केले आहेत.

या प्रकरणी शालिनीताई पाटील म्हणाल्या की, शरद पवार ठरवतील त्यांना कधी ‘रिटायर’ (निवृत्त) व्हायचे आहे. अजित पवार यांना प्रश्न विचारण्याचा काय अधिकार  आहे ? मी ९२ वर्र्षांची असल्याने उद्या मलाही वेडे ठरवतील. अजित पवार यांनी माझ्याकडे पैसा कुठून येतो ? याची चौकशी लावली. लाचलुचपत विभागाचे अधिकारी याची चौकशी करत होते. त्यांना मला सांगायचे आहे, मला ४ निवृत्तीवेतन मिळतात. मी माझा कारखाना सभासदांच्या हातात दिल्याविना गप्प बसणार नाही. काही दिवसांनी राजकीय पटलावर अजित पवार हे नाव नसेल. अजित पवार पुढच्या ४ मासांत कारागृहात जातील.

पुढे त्या म्हणाल्या की, अनेकदा मागूनही एकनाथ शिंदे मला भेटण्याची वेळ देत नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांनी माझा प्रश्न ५ दिवसांत सोडवला. मला १२ कोटी रुपये बाळासाहेब ठाकरे यांनी मिळवून दिले होते.