भारताला कोणत्या प्रकारचे शिक्षण आवश्यक आहे ?

आज ‘स्वामी विवेकानंद जयंती (दिनांकानुसार)’, म्हणजेच ‘राष्ट्रीय युवादिन’ आहे. त्या निमित्ताने…

स्वामी विवेकानंद

‘भारती’ मासिकाच्या संपादिका श्रीमती सरला घोषाल, बी.ए. (कला शाखेची पदवी) यांना स्वामी विवेकानंद यांनी दार्जिलिंगहून २४ एप्रिल १८९७ या दिवशी लिहिलेले पत्र येथे सारांश रूपात देत आहोत.

‘ज्या दिवसापासून शिक्षण, सभ्यता, प्रभृति गोष्टी हळूहळू वरच्या जातींतून खालच्या जातींत पसरू लागल्या, त्या दिवसापासूनच पाश्चात्त्य देशांची ‘आधुनिक सभ्यता’ आणि भारत, इजिप्त, रोम इत्यादी देशांची ‘प्राचीन सभ्यता’ यांच्यात भेद पडू लागला. हे प्रत्यक्ष पहातो आहे की, ज्या देशांतील सर्वसाधारण जनतेत विद्या, समजशक्ती इत्यादींची जितकी वाढ होते, तितक्या प्रमाणात तो देश उन्नत होतो. भारताचा जो सत्यानाश झाला आहे, त्याचे मूळ कारण, म्हणजे राजसत्ता आणि वर्णाभिमान यांच्या जोरावर देशांतील समस्त विद्या-बुद्धी काही मूठभर लोकांमध्ये डांबून ठेवणे, हेच होय. आपल्याला जर पुन्हा उठायचे असेल, तर आपणही तोच मार्ग चोखाळला पाहिजे, म्हणजेच सर्वसाधारण जनतेत विद्येचा प्रसार, शिक्षणाचा फैलाव केला पाहिजे. गेले अर्धे शतक समाजसुधारणांचा हैदोस चालू आहे. सतत १० वर्षे भारतातील नाना ठिकाणी भ्रमंती करून बघितले. समाजसुधारणेसाठी काढलेल्या समित्यांनी आणि संस्थांनी सारा देश भरून गेला आहे; परंतु ज्यांचे रक्त शोषून ‘सभ्य लोक’ या नावाने प्रसिद्ध असलेले लोक ‘सभ्य’ झाले आहेत अन् त्यांचे ‘सभ्यपण’ टिकून आहे, त्यांच्यासाठी मात्र मला कुठे एकही समिती आढळली नाही ? आपला देश मौलिकतेला का बरे अजिबात पारखा झाला आहे ? आमचे कसबी कारागीर का बरे युरोपांतील कारागिरांशी चढाओढीत टिकाव न धरता दिवसेंदिवस नामशेष होत आहेत ? आणि कशाच्या बळाने जर्मन कामगारांनी इंग्रज कामगारांचे शतकानुशतके रोवलेले पक्के आसन डळमळून टाकले आहे ? केवळ शिक्षण, शिक्षण आणि शिक्षण यामुळे !

१. आयर्लंडमधील लोकांमध्ये कशामुळे पालट झाला ?

युरोपातील अनेक शहरांमधून भ्रमण करतांना, तेथील गरीब लोकांच्या सुखसोयी आणि त्यांचे शिक्षण बघून आमच्या देशातील गरिबांची दशा मनात येई अन् मला रडू कोसळे. कशाने हा फरक पडला ? माझ्या मनोदेवतेने साद दिली ‘शिक्षणामुळे’ !  शिक्षणामुळे त्यांच्या ठायी आत्मविश्वास निर्माण होत आहे आणि त्यामुळे त्यांच्यातील अंतःस्थित, अव्यक्त ब्रह्म जागे होत आहे अन् आपल्यात मात्र ते हळूहळू संकोच पावत आहे. मी न्यूयॉर्कला बघत असे. इंग्रजांनी पायाखाली तुडवलेले, मायदेशी सर्वस्व लुबाडले गेलेले, गाठी एक छदामही नसलेले, पराकाष्ठेचे अडाणी असे आयर्लंडमधील लोक तिथे वसाहतीसाठी येत. त्यांची सगळी मालमत्ता, म्हणजे एक काठी आणि तिच्या टोकाला लोंबकळणारे एक फाटक्या कपड्यांचे बोचके. तोच माणूस आता ताठ होऊन चालतांना दिसे. त्याची वेशभूषा पार पालटून गेलेली असे ! हे असे कशाने झाले ? आमचे वेद म्हणतात, ‘त्या आयरिश माणसाला त्याच्या मायदेशात घृणेने आणि तिरस्काराने चहूकडून वेढून ठेवण्यात आले होते. समस्त प्रकृती, सारा आसमंत एकमुखाने सदानकदा त्याच्या कानीकपाळी ओरडत होता, ‘गड्या रे, तुला काही आशा नाही, तू गुलाम जन्मला आहेस आणि गुलामच रहाणे तुझ्या नशिबी आहे.’ जन्मापासून उठता बसता सदा हेच ऐकत गेल्यामुळे त्या गड्याचाही त्यावर विश्वास बसला. ते खरे आहे, असे तो समजू लागला. त्या गड्याने स्वतःला ‘हिप्नोटाईझ् (संमोहित)’ करून टाकले की, तो खरोखरच अगदी हीन आहे, त्याच्या ठायीचे ब्रह्म संकोच पावले अन् त्याने अमेरिकेत पाऊल ठेवतांच चहूकडून एकच निनाद त्याच्या कानांवर आदळू लागला. ‘गड्या, तूही अगदी आमच्यासारखाच माणूस आहेस. माणसानेच तर हे सारे काही केले आहे. तुझ्या-माझ्यासारखा माणूस काय वाटेल, ते करू शकतो. अंतःकरणात साहस बाळग, धीट हो !’  त्याच्यामधील ब्रह्म जागे झाले, स्वतः प्रकृतीनेच जणू त्याला म्हटले, ‘ऊठ, जागा हो’ इत्यादी.’

२. भारतात सध्या कोणते शिक्षण मिळते ?

तद्वतच आमच्या मुलांना जे काही शिक्षण मिळते, तेही संपूर्णपणे नास्तिभावात्मक असते. अगदीच अकरणात्मक स्वरूपाचे अन्  अभावात्मक असते. शाळेतील मुले शिकत काहीच नाहीत. केवळ त्यांचे स्वतःचे जे काही आहे, त्याची तोडाफोडी होते. आणखी काहीच नाही. याचा परिणाम होतो श्रद्धाहीनत्व – श्रद्धेचा अभाव ! जी श्रद्धा वेद-वेदांताचा मूलमंत्र आहे. ज्या श्रद्धेने नचिकेत्याचे ठायी साक्षात् यमाला तोंड देऊन त्याला प्रश्न विचारण्याचे साहस निर्माण केले होते, ज्या श्रद्धेच्या बळाने हे जग चालते, त्या श्रद्धेचा लोप ! गीतेत म्हटले आहे, ‘अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक ४०), म्हणजे ‘अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो.’ म्हणूनच आपण विनाशाच्या इतके जवळ येऊन ठेपलो आहोत.

३. मुलांना शिक्षण देण्याचे टप्पे

३ अ. आत्मविद्येचे शिक्षण : आता तरणोपाय, म्हणजे शिक्षणाचा आणि विद्येचा प्रसार. पहिले स्थान आत्मविद्येचे. आत्मविद्या हा शब्द उच्चारताच जटा, दंड, कमंडलु आणि गिरिगुहा मनात येतात; पण माझा तो अभिप्राय नाही. माझा ‘आत्मविद्ये’चा अर्थ हा नाही. मग काय आहे ? ज्या ज्ञानाने भवबंधनातून मुक्तीही लाभू शकते, त्या ज्ञानाने काय साधारण भौतिक उन्नती होऊ शकणार नाही ? जरूर होईल. मुक्ती, वैराग्य, त्याग हे सारे तर अगदी सर्वांत श्रेष्ठ आदर्श आहेत; परंतु ‘स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ४०), म्हणजे ‘हा धर्म थोडा जरी अंगी बाणला, तरी मोठमोठ्या भयांपासून रक्षण होते.’ जो कोणताही संप्रदाय या भारतात उदयास आला आहे, त्या सगळ्यांचीच या एका मुद्यावर संपूर्ण एकवाक्यता आहे की, या ‘जीवात्म्या’तच अनंत शक्ती अव्यक्त स्वरूपात सुप्त आहे. मुंगीपासून तो सर्वाेच्च सिद्ध पुरुषापर्यंत सर्वांच्या ठायी तोच आत्मा विद्यमान आहे. फरक आहे केवळ अभिव्यक्तीच्या न्यूनाधिकपणाचा. ‘पतंजलीं’नी आपल्या योगसूत्रांमध्ये म्हटल्याप्रमाणे ‘वरणभेदस्तु ततः क्षेत्रिकवत् ।’ (पातञ्जलयोगदर्शन, पाद ४, सूत्र ३), म्हणजे ‘ज्याप्रमाणे शेतकरी पाण्याच्या प्रवाहाचे अडथळे दूर करतो.’ तद्वत् संधी आणि योग्य क्षेत्र अन् समय लाभताच ती शक्ती प्रकट होते. ती शक्ती प्रत्येक जीवात – ब्रह्मदेवापासून अगदी क्षुद्र गवतापर्यंत प्रत्येकातच विद्यमान आहे, मग ती प्रकट होवो न होवो. दारोदार जाऊन आपल्याला ती शक्ती जागी करावी लागेल.

३ आ. शेतकी, व्यापार, उद्योगधंदे अशा लौकिक विद्या शिकवणे : द्वितीय म्हणजे या आत्मविद्येसमवेतच लौकिक विद्यांचा प्रसार करावा लागेल. लोकांना शिक्षण द्यावे लागेल. आपल्या देशांत हे सहस्रो निःस्वार्थी, दयावान लोक आहेत. सर्वस्वाचा त्याग करून ते संन्यासी झाले आहेत. हे संन्यासी ज्याप्रमाणे सर्वत्र संचार करून कसलाही मोबदला न घेता लोकांना धर्म शिकवतात, त्याचप्रमाणे त्यांच्यापैकी निदान निम्म्या जणांना ‘लौकिक विद्या शिकवणारे शिक्षक’ म्हणून सिद्ध करता येणे शक्य आहे. त्यासाठी प्रथम प्रत्येक प्रांताच्या राजधानीत एक एक केंद्र स्थापन करायला हवे आणि मग तेथून हळूहळू समस्त भारतभर पसरत गेले पाहिजे.

त्यानंतर म्हणजे गरिबांना जे शिक्षण द्यावयाचे, त्याचा पुष्कळसा भाग तोंडीच शिकवला जावयास हवा. गरीब लोक अधिकांश शिक्षण कानांनी ऐकूनच घेतील. त्यांच्यासाठी शाळा इत्यादी काढण्याची वेळ अजून आलेली नाही. हळूहळू या सर्व प्रमुख केंद्रांमध्ये शेतकी, व्यापार, उद्योगधंदे इत्यादींचे शिक्षण दिले जाईल आणि या देशांमध्ये कलांची उन्नती व्हावी; म्हणून तशा शाळा आणि कारखानेही काढण्यात येतील. त्यामध्ये निर्माण झालेल्या मालाची विक्री युरोप-अमेरिकेत होईल, यासाठी आधीच अस्तित्वात असलेल्या समित्याही स्थापता येतील. हुबेहूब पुरुषांसाठीच्या केंद्रासारखीच केंद्रे स्त्रियांसाठीही स्थापावी लागतील; परंतु या आपल्या देशात ही गोष्ट किती कठीण आणि किती अवघड आहे, हे आपण जाणतोच.

४. युरोप आणि अमेरिका यांच्याकडून शिक्षण कार्यासाठी धन मिळवणे

त्यानंतरचा प्रश्न म्हणजे या कार्यासाठी आवश्यक असलेले द्रव्यसाहाय्य कुठून येणार ? यासंबंधी माझा असा अगदी ठाम विश्वास आहे, ‘जो साप चावतो, त्यानेच स्वतःचे विष शोषून घेतले पाहिजे.’ या न्यायाने या कार्यासाठी इंग्लंड इत्यादी पाश्चात्त्य देशांतूनच पैसा आला पाहिजे आणि येईलही; परंतु त्यासाठी आमच्या धर्माचा युरोप अन् अमेरिका येथे प्रचार व्हायला हवा ! आधुनिक विज्ञानाने ख्रिस्तीप्रभृति धर्माचा पाया अजिबात नेस्तनाबूत करून टाकला आहे. त्यातच परत विलासीपणा हा धर्मप्रवृत्तीच प्रायः नष्ट करत आहे. युरोप आणि अमेरिका ही मोठ्या आशेने भारताकडे बघत आहेत. परोपकार करण्याची हीच वेळ आहे. शत्रूचे बालेकिल्ले सर करण्याची ही वेळ आणि संधी गमावता कामा नये.

५. तेजस्वी आणि वेदपारंगत स्त्रियांनी पाश्चात्त्य देशांमध्ये हिंदु धर्मप्रसार करण्याची आवश्यकता !

पाश्चात्त्य देशांमध्ये स्त्रियांचे राज्य, त्यांचा प्रभाव आणि त्यांचेच वर्चस्व आहे. जर आपणासारख्या (श्रीमती सरला घोषाल यांच्यासारख्या) कुणी धीट, तेजस्वी, विद्वान आणि वेदपारंगत स्त्रिया या वेळी इंग्लंडमध्ये जातील, तर मी अगदी छातीठोकपणे म्हणू शकतो, ‘प्रतिवर्षी कमीत कमी १० सहस्र तरी स्त्री-पुरुष भारताचा धर्म ग्रहण करून कृतार्थ होतील.’ आपल्या देशातून तिकडे एक रमाबाईच काय त्या गेल्या होत्या. त्यांचे इंग्रजी भाषेचे वा पाश्चात्त्य विज्ञान आणि कला यांचे ज्ञान तुटपुंजेच होते; पण तरीही त्यांनी सर्वांना चकित करून सोडले होते. जर आपल्यासारख्या कुणी तिकडे जातील, तर इंग्लंड ढवळून निघेल. जर भारतीय स्त्री, भारतीय वेशात, भारताच्या ऋषींच्या श्रीमुखावाटे निर्गत झालेल्या धर्माचा तिकडे प्रचार करील, तर मी दिव्य दृष्टीने बघत आहे, ‘एक प्रचंड लाट उसळून, ती समस्त पाश्चात्त्य भूमीला तुडुंब भरून टाकील.’ मैत्रेयी, सावित्री यांच्या या जन्मभूमीत काय एकाही स्त्रीला हे साहस करवणार नाही ?

६. अध्यात्माच्या शक्तीने संपूर्ण जगतावर विजय मिळवणे शक्य !

आपल्या अध्यात्माच्या शक्तीने आपण इंग्लंड काबीज करू, तो जिंकू. ‘नान्यः पन्था विद्यतेऽयनाय ।’ (श्वेताश्वतरोपनिषद्, अध्याय ३, श्लोक ८) म्हणजे ‘याखेरीज उद्धाराचा दुसरा मार्ग नाही.’ या दुर्दम्य असुराच्या मगरमिठीतून काय सभासमित्यांद्वारे स्वतःची सुटका होणे शक्य आहे का ? आपल्या अध्यात्माच्या शक्तीने आपण या असुराला देवता बनवले पाहिजे. आपणाजवळ धनबल, बुद्धीबल आणि विद्याबल आहे. आपण ही सुवर्णसंधी वायाच दवडणार काय ? ‘इंग्लंडवर विजय, युरोपवर विजय, अमेरिकेवर विजय’, हाच आता आपला महामंत्र व्हावयास हवा ! यानेच देशाचे कल्याण होईल. Expansion is the sign of life and we must spread the world over with our spiritual ideals. (अर्थ : विस्तार पावणे, हेच जीवनाचे चिन्ह होय आणि आपण सार्‍या जगभर पसरून आपल्या आध्यात्मिक आदर्शांचा सर्वदूर प्रचार केला पाहिजे.) अशी आशा आहे की, ‘उत्पत्स्यतेऽस्ति मम कोऽपि समानधर्मा कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ।’ म्हणजे ‘माझा समान धर्मा कुणी ना कुणी तरी असेलच आणि नसल्यास तो केव्हा ना केव्हा आणि कुठे ना कुठे तरी जन्मास येईलच; कारण काल अनंत आणि पृथ्वी अफाट आहे.’

– स्वामी विवेकानंद