शेकडो विद्यार्थ्यांचे आंदोलन !
नागपूर – ‘पीएच्.डी. फेलोशिप परीक्षेचा पेपर फुटला आहे’, असा आरोप करत येथे शेकडो विद्यार्थ्यांनी येथील कमला नेहरू महाविद्यालयाच्या बाहेर १० जानेवारी या दिवशी आंदोलन केले. या मुलांनी परीक्षेवर बहिष्कार घालत तीव्र रोष व्यक्त केला. राज्यशासनाच्या बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून ‘पीएच्.डी.’धारक विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या ‘फेलोशिप’साठी २४ डिसेंबर २०२३ या दिवशी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे चाळणी परीक्षा घेण्यात आली होती.
१. पुणे विद्यापिठाच्या ‘सेट’ विभागाकडून घेण्यात आलेल्या या परीक्षेत वर्ष २०१९ मध्ये झालेल्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका जशीच्या तशी विद्यार्थ्यांना दिली गेली; मात्र त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेऊन परीक्षा रहित करण्याची मागणी केली.
२. ‘आम्हाला पेपरची झेरॉक्स कॉपी देण्यात आली आहे’, असा आरोप कैलास चव्हाण या विद्यार्थ्याने केला. परीक्षेला ६३८ विद्यार्थी आले होते. केवळ ८ जणांनी परीक्षा दिली’, असे चव्हाण यांनी सांगितले.
३. आमदार अभिजित वंजारी यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे एकूण घेतले. त्यांनी बार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थांतील अधिकार्यांना दूरभाष करून माहिती दिली.
४. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाशी संपर्क साधूनही माहिती देण्यात आली; परंतु ‘प्रत्येक जण एकमेकांवर ढकलत आहे’, असे चव्हाण याने सांगितले.
५. बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे, सारथी संस्थेचे वरिष्ठ अधिकारी आणि महाज्योती संस्थेचे प्रमुख अधिकारी अन् विद्यापिठाचे पदाधिकारी यांनी याविषयी चर्चा करून पुन्हा परीक्षा घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार १० जानेवारी या दिवशी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
‘फेलोशिप’ ही आर्थिक साहाय्य मुख्यतः पदवीधर किंवा पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी असते आणि गुणवत्तेवर आधारित संधीही मानली जाते. जेथे विद्यार्थ्यांनी केलेले योगदान विचारात घेतले जाते. |
पुणे येथील विद्यार्थ्यांनी टाकला परीक्षेवर बहिष्कार !
पुणे – महाज्योती पीएच्.डी. फेलोशिपचा पेपर फुटल्यामुळे पुणे येथील विविध परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. यावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेट विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. ‘आम्ही परीक्षाच देत राहू कि संशोधन करू ?’, अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. संतप्त विद्यार्थ्यांनी सरसकट फेलोशिप देण्याची मागणीही केली आहे. |