पुणे – मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने ३२ मिळकतींचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. यामधून १६ कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली जाणार असली, तरी त्याचे मूल्य २०० कोटी रुपये आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी महापालिकेने थकबाकीदारांच्या २०२ मिळकतींचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. यातून ५४ कोटी रुपये थकबाकी वसूल केली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात ३२ मिळकतींच्या लिलावातून १६ कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत. या लिलावातील मिळकतीमध्ये दुकाने, कार्यालय, बंगला आदींचा समावेश आहे. मिळकतींचा लिलाव झाल्यानंतर, मिळकतीची थकबाकी महापालिका जमा करून घेणार आहे. उर्वरित रक्कम संबंधित जागा मालकास परत केली जाईल. त्यासाठी मिळकतधारकास ६ मासांच्या आत महापालिकेस अर्ज करावा लागणार आहे. अर्ज न केल्यास ही अधिकची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा केली जाईल, असे मिळकतकर विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांनी सांगितले.