महाराष्ट्र गुप्तवार्ता पोलीस खात्यातील ९१ पदांवर होणार कंत्राटी भरती !

मुंबई – महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता विभागाचा आकृतीबंध गृहविभागाने अंतिम केला असून याद्वारे गुप्तवार्ता विभाग आणि त्यांच्याशी संबंधित कार्यालयांमध्ये ९१ पदांवर कंत्राटीपद्धतीने कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त कार्यालय, विशेष सुरक्षा विभाग आणि महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी या कार्यालयांमध्ये ही कंत्राटी कर्मचार्‍यांची भरती होणार आहे.

८ जानेवारी या दिवशी याविषयीचा शासन आदेश गृहविभागाने काढला आहे. गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त कार्यालयात ५८, विशेष सुरक्षा विभागात १३, तर गुप्तवार्ता प्रबोधिनी विभागात २० पदे कंत्राटी पद्धतीने नियुक्त केली जाणार आहेत. यामध्ये शिपाई, नाईक, भोजन सेवक, धोबी, न्हावी, स्वच्छता कर्मचारी या पदांचा समावेश आहे. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात वर्ष २०१९ मध्ये कायमस्वरूपी असलेली ‘ड’ श्रेणीतील सर्व पदे रहित करून या सर्वांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त करणारा हा सुधारित आकृतीबंध महायुती सरकारने निश्चित केला आहे. या व्यतिरिक्त वर्ग ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील पदांमध्ये कोणताही पालट करण्यात आलेला नाही. पोलीस खात्यामध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करायची कि नाही ? यावरून काही मासांपूर्वी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात वाद निर्माण झाला होता. या वेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस विभागामध्ये कंत्राटी भरतीचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना घेण्यात आल्याचे म्हटले होते.