मुंबई – वर्ष १९०६ मध्ये ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी रायगड जिल्ह्यातील, कर्जत तालुक्याचे तहसील कार्यालय कर्जत गावातील टेकडीवर उभारले होते. आजपर्यंत तेथूनच व्यवहार चालत असे. त्यामुळे मागील २० वर्षांपासून कर्जत तहसील कार्यालय हे शहराच्या मध्यभागी आणि सर्वांच्या सोयीच्या ठिकाणी आणावे, अशी मागणी सातत्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेकडून केली जात होती. मागील दोन वर्षांपासून या नवीन प्रशासकीय भवन उभारण्याच्या कामाला गती येऊन ते आता पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येत्या ७ जानेवारीला या प्रशासन भवनाचे लोकार्पण होणार आहे. (ब्रिटिशांनी सुरक्षा आणि सोय यासाठी शहराबाहेर डोंगरावर बांधलेले कार्यालय स्वातंत्र्यानंतर एवढी वर्षे शहरच्या मध्यभागी न आणता त्या बाहेरील डोंगरावरूनच चालवले जाणे, ही प्रशासनाची कमालीची उदासीनता आणि निष्क्रीयता म्हणायला हवी ! – संपादक)
कर्जत तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ठिकाणी ही ३ मजली वास्तू बांधण्यात आली आहे. अनेक वर्षांनी एकाच इमारतीत अनेक सरकारी कार्यालये येणार असल्याने आता जनतेसाठी सुविधाजनक होणार आहे.