पुणे – मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद कुणीतरी घडवत आहे. आपल्याला वाटते, आपण जातीसाठी काहीतरी करत आहोत; पण हे कुणीतरी चालवत आहे, हे आपल्या लोकांना समजत नाही. महाराष्ट्र एकसंघ राहू नये; म्हणून सगळे प्रयत्न करत आहेत. आम्ही गाफील आहोत. ही महाराष्ट्राची दुर्दैवी शोकांतिका आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या प्रकट मुलाखतीत बोलत होते.
या वेळी राज ठाकरे म्हणाले …
१. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी एकमेकांशी आदराने बोलले पाहिजे. सध्या नावाचा अपभ्रंश केला जातो. त्यामुळे अपमान होतो. मराठी चित्रपटसृष्टीत केवळ कलावंत आहेत. इतर राज्यात ‘स्टार’ आहेत; ते एकमेकांशी आदराने बोलतात.
२. पूर्वी राजकारण, समाजकारण, संस्था आणि चळवळी या गोष्टी मध्यमवर्गियांच्या हातात होत्या. श्रीमंत आणि गरीब यांमध्ये मध्यमवर्ग हा दुवा होता. तो सुशिक्षित वर्ग होता. त्याला वर्ष १९९५ नंतर उतरती कळा लागली. वर्ष १९९५-९६ मध्ये मोबाईल, इंटरनेट, दूरदर्शन वाहिन्या आल्या. त्यानंतर मध्यमवर्गियांची मुले विदेशात गेली. सर्र्वांत अधिक ८२ कोटी वापरकर्ते भ्रमणभाषवर असून देश ‘व्हेंटिलेटर’वर आहे. परत एकदा मध्यमवर्गियांनी राजकारण, समाजकारण यात आले पाहिजे.
३. महाराष्ट्राला सूज्ञ लोकांची आवश्यकता आहे; केवळ सुशिक्षित असून उपयोग नाही. बहिणाबाई अशिक्षित होत्या; पण सूज्ञ होत्या. महाराष्ट्र हा दिशादर्शक आहे. कुठल्याही गोष्टीचा उगम महाराष्ट्रातून झाला आहे. त्याने देशाचे प्रबोधन केले आहे. आज तोच महाराष्ट्र सर्व ठिकाणी चाचपडत आहे. ही धोक्याची घंटा आहे.