Indian Navy : भारतीय नौदलाच्या अ‍ॅडमिरल पदाच्या अधिकार्‍यांच्या गणवेशावरील चिन्हांमध्ये पालट !

नवी देहली – इंग्रजांच्या काळापासून असलेल्या भारतीय नौदलाच्या अ‍ॅडमिरल पदांच्या अधिकार्‍यांच्या गणवेशावर खांद्याच्या ठिकाणी लावण्यात येणार्‍या चिन्हांमध्ये आता पालट करण्यात आला आहे. नवीन रचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतून प्रेरित आहे. यात नौदलाचा ध्वजही दर्शवण्यात आला आहे. नवीन चिन्हांवर गोल्डन नेव्ही बटन, अष्टकोन, दुर्बिण आणि तलवार दर्शवण्यात आली आहे. नौदलाने याविषयी सांगितले की, नवीन रचना स्वीकारणे गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होण्याची प्रक्रिया आहे.

४ डिसेंबर या ‘नौदल दिना’च्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुदुर्ग येथे आयोजित कार्यक्रमात नौदलातील श्रेणी आणि चिन्हे यांमध्ये पालट करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार हा पालट करण्यात आला आहे.