संभाजीनगर (वास्को) : शंखवाळ (साकवाळ) येथील पूर्वीचे श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेले स्थळ आता पुरातत्व वारसास्थळ झाले आहे. याला ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ असेही म्हणतात. हे संरक्षित स्थळ असूनही वर्ष २०१८ पासून प्रतिवर्ष ७ ते १६ जानेवारी या कालावधीत सेंट जोसेफ वाझ फेस्ताचे, तर वर्ष २०१९ पासून प्रतिवर्ष मार्च मासामध्ये ‘वॉकिंग पिलीग्रीमेज’चे (ख्रिस्त्यांच्या पायी तीर्थयात्रेचे) अवैधरित्या आयोजन केले जात आहे. माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार पुरातत्व खात्याच्या मते ‘वॉकिंग पिलीग्रीमेज’ ही ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळावरील पारंपरिक धार्मिक प्रथा नाही; मात्र तरीही नियमांचे उल्लंघन करून ‘वॉकिंग पिलीग्रीमेज’ आणि ‘फेस्त’ (ख्रिस्त्यांची जत्रा) यांचे आयोजन केले जात आहे. यंदाही जानेवारी मासात ‘फेस्त’ आणि मार्च मासात ‘वॉकिंग पिलीग्रीमेज’ यांचे अवैधरित्या आयोजन केले जाणार आहे. याची सिद्धता म्हणून या ठिकाणी लोखंडी सांगाडा उभारून शेडचे बांधकाम चालू आहे. हे पूर्वीचे श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेले स्थळ असल्याने हिंदूंनी या कार्यक्रमांना आणि येथील बांधकामाला विरोध दर्शवूनही पुरातत्व खाते त्याची जराही नोंद न घेता पोलीस संरक्षणात हे कार्यक्रम केले जातात.