अल्लाच्या कृपेने आणखी एक पुलवामा आक्रमण होईल ! – तल्हा मजहर

  • सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथील मदरशात शिकणार्‍या तल्हा मजहर या विद्यार्थ्याने दिली धमकी !

  • पोलिसांनी विद्यार्थ्याला घेतले कह्यात !

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – येथील देवबंद क्षेत्रात एका मदरशात शिकणार्‍या तल्हा मजहर नावाच्या विद्यार्थ्याने ‘एक्स’वरून एक पोस्ट केली आहे. यात तो म्हणतो की, १४ फेब्रुवारी २०१९ या दिवशी ज्याप्रकारे काश्मीरच्या पुलवामामध्ये आक्रमण करण्यात आले होते, तसे आक्रमण पुन्हा एकदा अल्लाच्या कृपेने करण्यात येईल. या प्रकरणी त्याला कह्यात घेऊन त्याची चौकशी केली जात आहे.

सौजन्य न्यूज वॉच इंडिया 

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार तल्हा मजहर हा मूळचा झारखंडच्या जमेशदपूर येथील आहे. त्याच्या अन्य सामाजिक माध्यमांवरील खात्यांचे अन्वेषणही केले जात आहे. यासंदर्भात सहारनपूरच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि एक संयुक्त पथक बनवण्यात आले आहे.

वर्ष २०१९ मधील पुलवामा येथील आक्रमण !

१४ फेब्रुवारी २०१९ या दिवशी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे जिहादी आतंकवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका पथकावर आक्रमण केले होते. पथकाच्या गाडीवर स्फोटकांनी भरलेल्या एक ट्रकने धडक दिली होती. यामुळे झालेल्या शक्तीशाली बाँबस्फोटात ४० सैनिक मारले गेले होते.

संपादकीय भूमिका 

मदरशांमध्ये कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जाते, हे विद्यार्थ्याच्या अशा धमकीवरून स्पष्ट होते. त्यामुळे सर्व मदरशांना टाळे ठोकून त्यांना मुख्य प्रवाहातील शिक्षण देण्यासाठी भाजप सरकारने पावले उचलावीत, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !