Qatar Indian Soldiers : कतारने भारताच्या ८ माजी नौसैनिकांची फाशीची शिक्षा केली रहित !

नवी देहली – कतारमध्ये कथित हेरगिरीच्या प्रकरणी तेथील न्यायालयाने भारताच्या ८ माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. तेथील न्यायालयाने आता ती रहित करून त्यांना कारावासाची शिक्षा केली आहे. कारावासाचा कालावधी मात्र अजून स्पष्ट झालेला नाही. कतारच्या अपील न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या सुनावणीच्या वेळी भारताचे राजदूत न्यायालयात उपस्थित होते. तसेच माजी सैनिकांचे कुटुंबीयही उपस्थित होते. भारताने या सैनिकांना कायदेशीर साहाय्य मिळण्यासाठी एक समितीही स्थापन केली होती.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात एक लेखी निवेदन प्रसारित केले आहे. यामध्ये या सुनावणीची माहिती देण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, कतारच्या अपील न्यायालयाने ‘दहरा ग्लोबल’ खटल्यामध्ये भारताच्या ८ माजी नौसैनिकांची फाशीची शिक्षा अल्प केली आहे. निर्णयाच्या तपशीलाची प्रतीक्षा आहे. आम्ही आमच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आधीपासून उभे आहोत आणि भविष्यातही सर्व प्रकारचे साहाय्य करू. याखेरीज आम्ही या सूत्रावर कतार प्रशासनाशी चर्चा चालू ठेवू.

कतारच्या गुप्तचर संस्थेच्या राज्य सुरक्षा विभागाने ३० ऑगस्ट २०२२ या दिवशी या माजी सैनिकांना अटक केली होती आणि याची माहिती भारतीय दूतावासाला १५ सप्टेंबरनंतर दिली होती. कॅप्टन नवतेज सिंह गिल, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कॅप्टन वीरेंद्र कुमार वर्मा, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर सुगनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि नाविक रागेश, अशी या माजी सैनिकांची नावे आहेत.