Shah Mahmood Qureshi : पाकचे माजी परराष्ट्रमंत्री कुरैशी यांची सुटका झाल्यानंतर पाकने त्यांना पुन्हा टाकले कारागृहात !

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांची कारागृहातून सुटका झाल्यानंतर लगेचच पोलिसांनी त्यांना पुन्हा अटक करून रावलपिंडी येथील कारागृहात टाकले आहे. या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात पोलीस कुरैशी यांना खेचत कारागृहात नेत असल्याचे दिसत आहे. त्यांना पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील एका प्रकरणाची माहिती उघड केल्यावरून अटक करण्यात आली होती. ‘त्यांना पुन्हा कोणत्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली ?’, ते समजू शकलेले नाही. कुरैशी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे उपाध्यक्षही आहेत.

सोमनाथ मंदिर पुन्हा पाडण्याची कुरैशी यांनी दिली होती धमकी !

शाह महमूद कुरैशी यांनी भारतातील गुजरातमधील सोमनाथ मंदिर पुन्हा एकदा पाडण्याची धमकी दिली होती. त्यांनी स्वतःला ‘महंमद गझनीचा वंशज’ म्हटले होते. कुरैशी यांनी हिंदुत्वाला ‘संकट’ म्हटले होते. त्यांच्या विविध राजकीय विधानांमुळे पाकिस्तानचे सौदी अरेबिया आणि अन्य अरब देशांशी संबंध बिघडले. कुरैशी यांनी तालिबानला ‘शांततेची संघटना’ म्हटले होते. (भारताच्या विरोधात, हिंदुत्वाच्या विरोधात पाकमधील सत्तेत असणार्‍या राजकारण्यांनी किती गोष्टी केल्या, तरी सत्ता जाताच त्यांना राजकीय छळाला सामोरे जावे लागते, हेच कुरैशी यांच्या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आले ! – संपादक)