Threat To Journalist : कणकवली (सिंधुदुर्ग) उपजिल्हा रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. अर्पिता आचरेकर यांनी कारवाईच्या भीतीने दिले त्यागपत्र !

पत्रकार श्री. भगवान लोके

सिंधुदुर्ग : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. अर्पिता आचरेकर या योग्य प्रकारे सेवा देत नसल्याचे आरोप झाले होते. त्यांच्या कार्यपद्धतीविषयी बातमी प्रसिद्ध केल्याने डॉ. आचरेकर यांनी धमकी दिल्याची तक्रार एका पत्रकाराने केली होती. यासह अन्य काही जणांनी डॉ. आचरेकर यांच्याविषयी प्रशासनाकडे तक्रार केली होती. या पार्श्‍वभूमीवर कारवाई होण्याच्या भीतीने डॉ. आचरेकर यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिल्याचे समजते.

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, डॉ. आचरेकर यांच्या सेवेविषयी रुग्णांच्या असलेल्या तक्रारीनुसार पत्रकार भगवान लोके यांनी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर त्यांना डॉ. आचरेकर यांनी भ्रमणभाषद्वारे धमकी दिली. या विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांना लेखी निवेदन देऊन डॉ. अर्पिता आचरेकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार डॉ. आचरेकर यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती, तसेच त्यांना नोटीसही पाठवण्यात आली होती. त्यामुळे संभाव्य कारवाई टाळण्यासाठी डॉ. आचरेकर यांनी २४ डिसेंबर या दिवशी त्यागपत्र दिले आहे. त्यामुळे पत्रकारांनी उभारलेल्या लढ्याला यश आले आहे.

सविस्तर वृत्त वाचा –

♦ Threat To Journalist : पत्रकाराला धमकी दिल्याच्या प्रकरणी कणकवली (सिंधुदुर्ग) उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या विरोधात गुन्हा नोंद
https://sanatanprabhat.org/marathi/740737.html