Minorities Apeasement : (म्हणे) ‘भारतातील अल्पसंख्यांकांवर पाकमधील अल्पसंख्यांकांसारखी स्थिती उद्भवेल !’ – माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो

माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांची गरळओक !

पणजी : भारतातील अल्पसंख्यांकांना पाकमधील हिंदू आणि ख्रिस्ती यांच्यासारख्या स्थितीला सामोरे जावे लागू शकते. पाकमधील हिंदू आणि ख्रिस्ती दुसर्‍या श्रेणीतील नागरिकांसारखे तेथे अत्यंत भीतीदायक वातावरणात जीवन जगत आहेत. तशीच स्थिती येथेही (भारतात) होऊ शकते, याची मला भीती वाटते, असे वक्तव्य ‘पद्मभूषण’ पुरस्कार विजेते माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी केले आहे. ‘भारतात गाझासारखी परिस्थिती उद्भवणार नाही’, असेही त्यांनी या वेळी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याला गोव्यातील भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.

ज्युलिओ रिबेरो यांनी केलेली अन्य वक्तव्ये

‘पद्मभूषण’ पुरस्कार विजेते माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच देहली येथे नाताळच्या दिवशी काही ख्रिस्ती लोकांशी संवाद साधला. या पार्श्‍वभूमीवर रिबेरो यांनी ‘पंतप्रधान केरळमधील मोठ्या ख्रिस्ती समुदायाला स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

२. पंतप्रधानांच्या कृतीला एक बिशप भुलले, तसे आणखीही काही जण भुलतील, असे मला वाटते. पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेल्या पुष्कळ गोष्टी या केवळ मते मिळवण्यासाठी सांगितल्या आहेत, हे माझ्या ख्रिस्ती आणि अन्य मित्रांना कळू लागले आहे. त्यांना (पंतप्रधान मोदी यांना) मते मिळतीलही. नाताळच्या निमित्ताने त्यांनी (मोदी यांनी) दिलेला संदेश हे त्यांचे हृदयपरिवर्तन झाल्याने दिला असेल, तर चांगले आहे; परंतु त्याविषयी मला शंका वाटते; कारण यामागे ‘भगवा पाकिस्तान’ निर्माण करण्याचा हेतू आहे.

३. पोलीसदलावर टीका करतांना रिबेरो यांनी म्हटले की, भारतातील पोलीसदल राजकारण्यांकडून चालवले जाते. ‘आज सरकार ज्या पद्धतीने पोलिसांकडून काम करवून घेत आहे, तसे काम मी करू शकलो नसतो’, असे मुंबईतील माजी पोलीस आयुक्तांनी म्हटले होते. पोलीस पूर्णतः सरकारच्या हातात गेले आहे, यात काहीही शंका नाही. आज जे (पोलीस) पुढे गेले आहेत, त्यांनी सरकारशी हातमिळवणी केली आहे किंवा विरोध केलेला नाही. कोणत्याही पक्षाचे सरकार असले, तरी पोलीस त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागतात. पोलिसांना बळ मिळणे आवश्यक आहे; परंतु कुणीही याला सहमत नाही.

गोवा भाजपकडून रिबेरो यांना प्रत्युत्तर

भाजपचे गोव्यातील प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी ज्युलिओ रिबेरो यांचा निषेध करतांना प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,

१. ज्युलिओ रिबेरो यांनी केलेल्या विधानामुळे आमचा आशाभंग झाला आहे. त्यांनी भारताची पाकिस्तानसह केलेली तुलना आक्षेपार्ह आहे. त्यांनी राजकीय विषयासंबंधी केलेल्या टिपण्या पक्षपाती आहेत आणि वस्तूस्थितीला धरून नाहीत.

२. ‘भगवा पाकिस्तान’ या शब्दाचा वापर करून त्यांनी सध्याच्या केंद्र सरकारच्या विरोधातील स्वतःचा द्वेष आणि आकस प्रकट केला आहे, जो त्यांच्या विचारधारेला साजेसा नाही.

३. यापूर्वी प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘ख्रिस्ती म्हणून अचानकपणे मी माझ्याच देशात परका झालो’, या पुस्तकाद्वारेही त्यांनी द्वेष प्रकट केला होता. त्यांनी आता केलेली विधाने त्यांच्या पुस्तकाचा खप वाढवण्यासाठी केली असली, तरी वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी भारताची पाकसारख्या अयशस्वी देशाशी तुलना करणे अयोग्य आहे.

४. रिबेरो यांनी अल्पसंख्यांकांविषयी केलेली विधाने आधारहीन आहेत. ‘इन्क्विझिशन’च्या (धर्मच्छळाच्या) काळात गोव्यात बहुसंख्यांकांवर अनन्वित अत्याचार झाले होते, हे त्यांनी लक्षात घ्यावे.

५. सध्याचे केंद्र सरकार ‘सबका साथ सबका विकास’ या तत्त्वावर काम करते. अनेकांना त्याचा लाभही होत आहे. रिबेरो आणि अन्य यांना आम्ही विनंती करतो की, त्यांनी वस्तूस्थिती आणि सत्य लक्षात घेऊन संवाद साधावा. चुकीचे आणि निराधार वक्तव्य केल्याने समाज विभाजित अन् कमकुवत होतो.

६. स्वातंत्र्याच्या वेळी पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांची लोकसंख्या २३ टक्क्यांवरून न्यून होऊन ५ टक्क्यांपेक्षाही न्यून झाली आहे. त्याउलट भारतातील अल्पसंख्यांकांची स्वातंत्र्याच्या वेळी असलेली लोकसंख्या १६ टक्क्यांवरून शेवटच्या जनगणनेपर्यंत २१ टक्के इतकी वाढली आहे.

भाजप गोवा ने दिलेले प्रसिद्धीपत्रक –

संपादकीय भूमिका

  • ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्राप्त केलेले आणि अल्पसंख्य समाजातील माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी पोलीसदलातील अधिकारी पद भूषवले अन् ‘पद्मभूषण’सारखा उच्च पुरस्कारही प्राप्त केला, तरीही त्यांनी भारताविषयी केलेले वक्तव्य त्यांच्यातील देशप्रेमाविषयी शंका उपस्थित करणारे म्हणावे लागेल !
  • रिबेरो यांना पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांची भयावह स्थिती ठाऊक असतांना ते त्याविषयी काहीही बोलत नाहीत, हे आश्‍चर्यकारकच !