१. ‘बाह्य औदुंबराचा संबंध कर्मकांड आणि उपासनाकांड यांच्याशी अन् अंतर् औदुंबराचा संबंध ज्ञानकांडाशी असणे
कर्मकांड आणि उपासनाकांड या अंतर्गत साधना करतांना जिवाचा कल दत्ततत्त्वाचे प्रतीक असलेल्या बाह्य औदुंबराकडे असतो. त्यामुळे आध्यात्मिक उन्नती अल्प आणि सावकाश होते. ज्ञानकांडामध्ये अंतर् औदुंबराचे, म्हणजे अंतर् आध्यात्मिक प्रवासाचे भान असते आणि कुंडलिनीला सहस्रारामध्ये स्थिर करून निर्गुणाची अनुभूती घेता येते.
२. औदुंबराचे फूल न दिसणे, म्हणजे निर्गुण तत्त्व न दिसणे
औदुंबराचे फूल म्हणजे निर्गुण तत्त्वाची किंवा निराकार परमेश्वराची अनुभूती याचाच अर्थ जे डोळ्यांनी पहाता येत नाही; मात्र अनुभवता येते असे.
३. औदुंबराचे फळ म्हणजे निर्गुणाची अनुभूती
निर्गुण दिसत नसले, म्हणजे औदुंबराचे फूल दिसत नसले, तरी त्याचे दृश्य स्वरूप म्हणजे आनंद अनुभवता येतो, म्हणजेच मोदकाचा आकार असलेले औदुंबराचे फळ दिसते.
औदुंबराचे फळ म्हणजे सिद्ध अवस्थेतील निर्गुणाची अनुभूती घेतल्यानंतरची अक्षय आनंदावस्था.’
– ईश्वर (सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या माध्यमातून)
गोवा येथील सनातनच्या रामनाथी आश्रमात दत्तमाला मंत्रजपाचे पठण केल्यानंतर २०२ औदुंबराची रोपे उगवणे !योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या आज्ञेनुसार रामनाथी येथील सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात वर्ष २०१५ मध्ये दत्तमाला मंत्रजपाचे पठण चालू झाले. त्या दिवसापासून आश्रमात दिवसेंदिवस दत्ततत्त्व वाढत असल्याची प्रचीती साधकांना आली. त्यानंतर आश्रमाच्या परिसरात एक वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक पालट झाला. पठण चालू झाल्यावर काही कालावधीत ध्यानमंदिराच्या शेजारील यज्ञकुंडाच्या परिसरात औदुंबराची २०२ रोपे आपोआप उगवली होती. ‘मंत्रपठणामुळे वातावरण सत्त्वप्रधान होते आणि मंत्रातील तत्त्वानुसार निसर्गातही सकारात्मक पालट होतो’, ही गोष्टही यामुळे सिद्ध झाली ! – एक साधक |