दत्ताचा नामजप केल्याने पूर्वजांना गती मिळण्यामागील शास्त्र

पूर्वजांना नागरूप घेणे सोपे जात असण्यामागील कार्यकारणभाव

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. पूर्वजांना सर्पयोनीत जाणे सोपे असल्याने ते सूक्ष्मातून नागाच्या रूपात दिसणे आणि त्यांचे नागरूपातील अस्तित्व घरात जाणवणे

‘बर्‍याचदा पूर्वज नागाच्या रूपात दिसतात; कारण मनुष्यदेहातील शुक्रजंतूंचा (स्पर्मचा) आकारही नागासारखाच असतो. त्यांचे रूप सर्पिलाकार, म्हणजेच सापासारखे असते. हेच मनुष्यदेहातील प्रकृतीचे मूलतत्त्व असल्याने त्याला मेल्यानंतर आपल्यासारख्या दिसणार्‍या शुक्रजंतूंच्या आकारातील सर्पयोनीमध्ये जाणे सोपे जाते; म्हणून बर्‍याचदा चांगले लिंगदेह असतात, ते पिवळ्या नागाच्या रूपात दिसतात, तर अतृप्त असणारे लिंगदेह हे काळ्या नागांच्या रूपात दिसतात. ही रूपे सूक्ष्म असतात; म्हणून ती कधी स्वप्नात दिसतात, तर काही वेळा त्यांचे नागरूपातील अस्तित्व घरातही जाणवते.

२. पूर्वजांच्या आशा-आकांक्षा घरातील वातावरणाशी, तसेच कुटुंबियांशी संबंधित असल्याने त्यांनी कुटुंबियांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणे आणि अतृप्त राहिलेल्या इच्छा बोलून दाखवणे

बहुतेक वेळा पूर्वजांच्या आशा-आकांक्षा या घरातील वातावरणाशी, तसेच आपल्या कुटुंबियांशी संबंधित असतात. त्यामुळे बहुतेक वेळा पूर्वजांचे लिंगदेह नागाच्या अथवा सर्पाच्या रूपात आपल्या कुटुंबियांना दर्शन देऊन त्यांना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात अथवा त्यांच्याकडे आपल्या अतृप्त राहिलेल्या इच्छा बोलूनही दाखवतात. बर्‍याचदा घरात एखादा महत्त्वाचा कार्यक्रम असेल, उदा. लग्न, मुंज, बारसे किंवा डोहाळजेवण, अशा वेळी तर ते घरातल्या वातावरणात येतातच; कारण त्यांच्यासाठीसुद्धा तो एक महत्त्वाचा प्रसंग असतो आणि त्या प्रसंगाच्या वेळी त्यांची उपस्थिती काही वेळा इतरांना जाणवतेही. बर्‍याचदा अशा प्रसंगांच्या छायाचित्रणाच्या वेळी ते लहान लहान (ऑर्ब्स) गोळ्यांच्या रूपात वातावरणात जमा झालेले दिसतात. काही वेळा महत्त्वाचा कार्यक्रम होण्यापूर्वीच ते स्वप्नात येऊन कधी कधी त्या कार्यक्रमासंबंधी सूचनाही करतात.

३. पूर्वज कधी मानवाच्या, तर कधी विकृत रूपात दिसणे आणि त्यांच्यामुळे होणार्‍या त्रासावर उपाय म्हणून दत्ताचा जप केल्याने लिंगदेहांना गती मिळणे

काही वेळा पूर्वज सापांच्या रूपात न दिसता त्यांच्या मूळ रूपात, म्हणजेच मानवी रूपातही दिसतात, तर कधी विकृत रूपातही दिसतात. बहुतांशी नकारात्मक स्पंदनांनी भारित असणारे लिंगदेह विकृत दिसतात. त्यामुळे अशा लिंगदेहांच्या घरात वावरण्याने कुटुंबियांना त्रास होऊ शकतो. या त्रासावर उपाय म्हणून ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप केल्याने अशा लिंगदेहांना गती मिळते आणि ते भूलोकातील वातावरण सोडून पुढच्या लोकात निघून जातात.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, होसूर, तमिळनाडू.
(सर्व संदर्भ : देवतांची उपासना : दत्त – खंड १)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.